Friday, 27 June 2014

अविस्मरणीय ग्रीस - भाग २ - अथेन्स

 .

सकाळी उठून, नाश्ता करून आम्ही हॉटेल खालूनचं टॅक्सी पकडली आणि अरिस्तेप्पू स्ट्रीटवरच्या लायकाबेट्टस टेलेफेरीकला पोहोचलो. टेलेफेरीक ही एक केबल रेल्वे आहे जी तुम्हाला डोंगरमाथ्यावर घेऊन जाते. ह्याला फनीक्युलर रेल्वे असे ही म्हटले जाते. ह्याचे बांधकाम १९६० मध्ये पूर्ण झाले व १९६५ ला हिचे उद्घाटन झाले.

.

टेलेफेरीक प्रवेशद्वार

.

फनीक्युलर रेल्वेतून जाताना

.

फनीक्युलर रेल्वे. वरिल चित्र आंजावरुन साभार

इथे जाण्यास तुम्ही लायकाबेट्टस रंगमंचापर्यंत टॅक्सी करु शकता व तिथून तुम्ही वर डोंगरावर पायी चढून ही जाऊ शकता.

लायकाबेट्टस डोंगर हा चुनखडीचा डोंगर आहे. समुद्रसपाटीपासून ९०८ फीट उंच असा हा डोंगर आहे ज्याचे अधम सर्व बाजुंनी पाईन झाडांनी वेढलेले आहे. ग्रीक पुराणानुसार अथेनादेवी जेव्हा अॅक्रोपोलिसवरच्या तिच्या मंदिराचा बांधकामासाठी शिळा घेऊन जात होती तेव्हा तिच्या हातून त्यातील जो दगड खाली पडला त्याचा हा डोंगर तयार झाला. एकेकाळी तिथे लांडगे वावरत असलेले अरण्य होते आणि ग्रीक भाषेत लांडग्याला लायकोस म्हणतात म्हणून ह्या डोंगराला लायकाबेट्टस असे नाव पडले.

ह्या डोंगरावर सेंट.जॉर्ज चे एक चर्च / चॅपल आहे. पांढर्‍या शुभ्र रंगाचे चर्च अत्यंत साधे पण तितकेच सुंदर दिसते. इथे आत फोटो काढायला मनाई आहे. असे मानले जाते की राणी ओल्गाला ह्या चर्चचे भग्नावशेष सापडले होते. तिने त्याचा जीर्णोद्धार केला. संपूर्ण परिसर संगमरवराने सजलेला आहे आणि तेथेच राणी ओल्गाने एक बेल टॉवर बांधला आहे.

सेंट.जॉर्ज चॅपल

.

बेल टॉवर

.

इथून संपूर्ण अथेन्स शहराचे मोहक दृश्य दिसते.

.

लायकाबेट्टसवरुन दिसणारा अॅक्रोपोलिस.

.

अथेन्स शहराचे दृश्य.

.

खाली एक भले मोठे गार्डन रेस्टॉरंट आहे आणि थोडं खाली उतरून गेलं की लायकाबेट्टस रंगमंच आहे.

.

.

गार्डन रेस्टॉरंट

.

लायकाबेट्टस रंगमंच

लायकाबेट्टसवरून आम्ही खाली उतरलो व थेट ग्रीक पार्लमेंट बघायला गेलो. आम्ही सिंतागामा स्क्वेअरला पोहोचलो , पुरातन ग्रीक भाषेनुसार सिंतागामा म्हणजे "आखणी", "करार" तर आधुनिक ग्रीक भाषेनुसार सिंतागामा म्हणजे "राज्यघटना". ३ सप्टेंबर १८४३ मध्ये ऑट्टो राजाने मान्यता दिलेली ग्रीक राज्यघटना, म्हणजेच सिंतगामा. तर ह्या सिंतागामा स्क्वेअरला पोहोचताच त्याच्या मेट्रो स्टेशनाच्या पलीकडे आहे ग्रीक पार्लमेंट जिथे दर तासाला चेंज ऑफ गार्ड्स होतं Tomb of the Unknown Soldiers समोर.

.

Tomb of the Unknown Soldiers

ग्रीक सैनिकांना Evzones किंवा Evzoni असे म्हटले जाते. सैन्यात भरती होण्यासाठी ह्या सैनिकांची उंची कमीतकमी ६'१ फी. असावी लागते. त्यांचा पेहराव/ गणवेष ही खासचं असतो. भल्या मोठ्या बाह्यांचा पांढरा किंवा खाकी अंगरखा असतो, त्याखाली लोकरीची घट्ट विजार. डोक्यावर लाल टोपी आणि त्या टोपीला भला मोठा काळा रेशमी गोंडा. लाल चामडी बुट ज्याच्या सोलला बुटाच्या मापाप्रमाणे ६० ते १२० खिळे असतात ह्या बुटांना Tsarouhi असे म्हणतात.

Tsarouhi

.

त्यांची मार्च पास्ट करण्याची एक विशिष्ट पद्ध्त आहे. नेहमीप्रमाणे मार्चींग सुरु करुन हळु हळू एक-एक पाय उचलून मार्च पास्ट करायचे आणि मग उजवा पाय जोरात आपटत चालायचे. त्यांच्या बुटांवर काळ्या रंगाचा मोठ गोंडा असतो ज्याला पॉम पॉम म्हण्ट्ले जाते. हे एव्हझोन्स एकमेकांसोबत दर पंधरा मिनिटांनी जागा बदलतात व इतरवेळी नि:स्तब्ध उभे असतात.

.

चेंज ऑफ गार्ड्स

.

चेंज ऑफ गार्ड्स

अनेक पर्यटक त्यांच्याबरोबर फोटो काढायला उत्सुक असतात , फोटोग्राफीला परवानगी आहे देखील पण कुठल्याही प्रकारच्या खाणाखुणा उदा: व्हिक्टरीसाईन किंवा त्यांना हात लावायला मनाई आहे. एव्हझोन्स ना कुणी त्रास देत नाही ना ह्यावर लक्ष ठ्वणारे दुसरे सैनिक तेथे हजर असतात.

.

एव्हझोन्स

.

एव्हझोन्स

तेथून आम्ही प्लाका मार्केटला फिरायला गेलो. वेगवेगळ्या प्रकाराचे कॅफे, सोव्हेनियरची दुकाने , ग्रीक मिठाया - बकालावा, कतैफीची दुकाने, ऑलिव्ह ऑईलची दुकाने, ग्रीक हस्तकलेची दुकाने एक ना अनेक .

.

प्लाका

.

विविध उपहारगृह

.

दुकाने

.

दुकाने

.

गणपतींची चादर विकणारा स्टॉल

प्लाका मध्ये फिरता फिरता खरेदी करता करता वेळ कसा गेला समजले नाही. फिरता फिरता आम्ही Monastiraki ला येऊन पोहोचलो. तिथे आम्हाला अनेक दुकाने , उपहारगृह दिसली आता भुक ही लागली होती, वाटेत एक माणूस ओल्या नारळाचे तुकडे विकत होता, त्या उन्हात तो थंडगार नारळाचा तुकडा खाताना काय आनंद झाला म्हणून सांगू.

.

Monastiraki

तिथून पुढे एका दुकानात गेलो आणि तिथून अ‍ॅलेक्झँडर दी ग्रेटचा पुतळा खरेदी केला. त्या दुकानासमोर रोमन हाड्रियनच्या ग्रंथालयाचे भग्नावशेष दिसत होते.

.

हाड्रियनच्या ग्रंथालयाचे भग्नावशेष

.

हाड्रियनच्या ग्रंथालयाचे भग्नावशेष

आता भुक ही लागली होती म्हणून तिथल्याच स्केवरमधल्या एका उपहारगृहात आम्ही ग्रीक चिकन सुवालाकी खाल्लं. पिटामध्ये ग्रील्ड चिकन, सॅलॅड्स, त्झात्झिकि , चिली-मेयो, ऑलिव्ह्स, फ्रेंच फ्राईज असे रोल करुन देतात. त्याच बरोबर आम्ही लेमोनेड आणि पुरुषांनी तिकडची प्रसिद्ध मिथोस बियर आणि Courgette पॅटिस विथ त्झात्झिकी डिप मागवले.

.

ग्रीक सुवालाकी

बसल्या बसल्या तिकडच्या उपहारागृहात ठेवलेल्या तिळाचा ब्रेड दिसला :) त्याला Koulóuria म्हणतात .

.

Koulóuria

आता Monastiraki पर्यंत आलोच होतो म्हणून तसेच तेथून आम्ही पिराऊसला जाण्यासाठी मेट्रो पकडली. २०-२५ मिनिटांत आम्ही पिरऊसला पोहोचलो. पिराऊसला जाऊन आम्ही ब्ल्यु स्टार फेरीजच्या कार्यालयात जाऊन आमची नॅक्सोस व सॅंटोरीनीची बूक केलेली तिकिट कंफर्म केली.

.

पिराऊस बंदरावर दिसणारी नॅक्सोसची बोट.

उद्या आम्हाला सकाळी सातची बोट पकडायची होती नॅक्सोससाठी. आजचा दिवस पण मस्तं मजेत गेला होता. आम्ही पिराऊसवरुन ओमोनियाला जाणारी मेट्रो पकडली आणि हॉटेलला पोहोचलो. मस्तं हॉटेलवरच जेवण मागावले आणि कालसारखेच हॉटेलच्या गच्चीवर लायकाबेट्ट्सला न्याहाळत, गप्पा मारत मस्तं जेवलो :)

.

पहाटे ५:४५ ला हॉटेल सोडायचे होते म्हणून लवकर जेवणं आटोपून आम्ही रुममध्ये आलो आणि गादीवर पडल्या पडल्या गाढ झोपी गेलो.

क्रमशः

Friday, 20 June 2014

अविस्मरणीय ग्रीस - भाग १ - अथेन्स

 सकाळी लवकर उठून , मस्तं नाश्ता करून आम्ही नऊला हॉटेलमधून बाहेर पडलो. थेट टॅक्सी करून आम्ही अ‍ॅक्रोपोलीसला गेलो. तिथे पोहोचताच आम्हाला दुरूनच Parthenonचे दर्शन झाले. भराभर थोडे वर चढून तिकिट काढायला गेलो , तिथे थोडी रांग होतीच शिवाय नऊनंतर अनेक पर्यटक बसमधून Parthenon बघायला मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे गर्दी होतेच. पटापटा तिकिटं काढून आम्ही वर चढायला सुरुवात केली, वातावरण मध्येच ऊन मध्येच ढगाळ असे होते त्यामुळे पाऊस येतो की काय असे उगाच वाटून गेले. १५-२० मिनिटांत आम्ही अ‍ॅक्रोपोलिसची चढाई पूर्ण केली.

.

अ‍ॅक्रोपोलिसच्या पायथ्याशी दिसणारे Parthenon

ग्रीक भाषेत अ‍ॅक्रो म्हणजे टोक, परामावधी आणि पोलिस म्हणजे शहर. शहराच्या संरक्षणासाठी अ‍ॅक्रोपोलिस डोंगरावर किंवा उंच टेकडीवर(एका प्रकारचे किल्लेच जिथे अनेक इमारती असत) बांधले गेले. अ‍ॅक्रोपोलिस समुद्रसपाटीपासून १५० मि. उंच असलेल्या एका टेकडीवर वसलेले आहे. तिथेच Parthenon बांधले गेले आहे.

वर चढत असताना दिसणारे Theatre of Dionysus Eleuthereus (Dionysus चे रंगमंच). Dionysus हा द्राक्षापासून बनणार्‍या वाईनचा देव असे मानले जाते. ग्रीक पुराणानुसार तो झ्युस राजा व सेम्हलीचा मुलगा होता. त्याच्या सन्मानार्थ हा रंगमंच बनवला गेला.

.

Parthenon हे ग्रीक लोकांनी अथेना देवीच्या सन्मानार्थ बांधलेले आहे. अथेन्स शहराला नावदेखील अथेनादेवीच्या नावावरुन दिले गेले आहे. Parthenonचे बांधकाम ४३८ BC मध्ये पूर्ण झाले पण त्याचे सुशोभिकरणाचे काम ४३२ BC पर्यंत सुरु होते. Parthenon चा वापर खजिना ठेवायला ही होत असे. ५ADच्या शतकात Parthenon वर ख्रिस्तींचे आक्रमण होऊन त्याचे चर्चमध्ये रुपांतर करण्यात आले होते. १४६० च्या दशकात तुर्कींनी Parthenon वर विजय मिळवून त्याचे मशीदीत रुपांतर केले. मग काही काळाने व्हेनेशीयन साम्राज्यातील लोकांनी घडवून आणलेल्या स्फोटात Parthenon चे बरेच नुकसान झाले.

.

थोडे पुढे येताच उजव्या बाजूला दिसते Parthenon. Parthenon ला समोर आणि मागे असे आठ खांब आहेत तर बाजूला सतरा खांब आहेत. समोर आणि मागच्या खांबांवर त्रिकोणिका आहे ज्याला पूर्व त्रिकोणिका आणि पश्चिम त्रिकोणिका असे म्हटले जाते. पूर्व त्रिकोणिकेवर झ्युस राजाच्या शिरातून अथेनादेवीचा जन्म झाला ह्यांचे शिल्प होते तर पश्चिम त्रिकोणिकेवर अथेनादेवी, राजा Poseidon, घोडे व इतर देवांचे शिल्प होते. आता तिथे फक्त त्रिकोणिकेचे काही अवशेष उरलेत.

.

.

डाव्या बाजूला दिसते ते Erechtheionचे मंदिर. ग्रीक पुराणानुसार हे मंदिर राजा Erechtheion च्या स्मर्णार्थ बांधले गेले होते, असे मानले जाते की राजा Erechtheion ला तिथे जवळपास पुरण्यात आले होते. धरतीपुत्र Erechtheion चा सांभाळ अथेनादेवीने केला होता. ह्याच्या मंदिरा च्या दक्षिणेला सहा खांब आहेत ज्यांना "Porch of the Maidens" असे म्हटले जाते. ह्या खांबाना स्त्रीरुपात कोरले गेले आहे ज्यांना Caryatid म्हणतात.

.

"Porch of the Maidens"

.

Parthenon वरून दिसणारे अथेन्स शहराचे मोहक दृश्य.

.

Parthenon वरून दिसणारा Lycabettus डोंगर.

.

Parthenon वरून दिसणारे The Temple of Olympian Zeus चे भग्नावशेष.

.

फिरून खाली येत असताना हलकीच पावसाची एक सर येऊन गेली आणि त्या उकाड्यात आम्हाला शितल, शांत, प्रसन्न वाटू लागले. खाली उतरून एका सोव्हेनियरच्या दुकानात गेलो व सोव्हेनियर खरेदी करुन आम्ही तिथूनच थोडे चालल्यावर The New Acropolis Museum ला गेलो.

.

तिथे जाताना अगदी मेन एंट्रेंसपाशी खाली भग्नावशेष जतन करुन ठेवलेले दिसतात. त्यात एक विशींग वेल सारखी छोटी विहिर होती ज्यात असंख्य नाणी पडलेली दिसत होती.

.

.

विशींग वेल

संग्रहालयात शिरताच क्लोकरुम मध्ये बॅगपॅक्स ठेवून आम्ही संग्रहालय फिरायला सुरुवात केली. संपूर्ण ग्रीक इतिहासाबद्दल येथे माहिती उपलब्ध आहे. उतखननात सापडलेल्या अनेक वस्तू येथे काचेच्या कपाटात जतन करुन ठेवल्या आहेत. अनेक प्रकारचे शिल्पं, मातीची भांडी, फुलदाणी, पुतळे, भग्नावशेष अशा अनेक वस्तू संग्रहीत केल्या आहे. संग्रहालयात फ्लॅश फोटोग्राफीला परवानगी नाही शिवाय इतके मोठले संग्रहालय बघण्याचा आनंद मला घ्यायचा होता त्यामुळे थोडेच फोटो काढले :)

.

.

.

.

संग्रहालयाच्या तिसर्‍या मजल्यावर एक व्हिडियो क्लिप दाखवतात ज्यात Parthenon बद्दल माहिती दिली आहे.

आताशी भुक ही कडकडून लागली होती म्हणूनच संग्राहलयाच्या एका रेस्टॉरंटमध्ये मस्तंपैकी पिटा-चिकन कबाब, ग्रील्ड चिकन विथ पटेटो व्हेजेस, चिकपी सॅलॅड विथ सन ड्राईड टोमॅटो सॉस आणि ग्रीक फ्रॅपे असे जेवून आम्ही तिथून The Temple of Olympian Zeus ला निघालो.

.

वाटेत आम्हाला आर्क ऑफ हॅड्रियन लागले. हा आर्क रोमन राजा हॅड्रियनच्या सन्मानार्थ १३२ AD मध्ये बांधण्यात आला होता. संपूर्ण आर्क Pentelic संगमरवरापासून बनविला आहे.

.

The Temple of Olympian Zeus चे फक्त भग्नावशेषच बघायला मिळतात. संपूर्ण परीसराला दोरीचे कुंपण घातले गेले आहे. हे मंदिर राजा झ्युसला समर्पित केले आहे.

.

The Temple of Olympian Zeus आणि मागे दिसणारा अ‍ॅक्रोपोलिस.

.

तिथून पुढे चालत गेलो की एक दहा मिनिटात आपण अथेन्सच्या Panathenaic स्टेडियमला येऊन पोहोचतो. ह्या स्टेडियमला Kallimarmaro असे ही म्हटले जाते ज्याचा अर्थ Beautifully marbled असा आहे. ३२९BC मध्ये ह्याचे पुर्नःबांधकाम करुन हे पूर्णपणे संगमरवराचे बांधले गेले. ह्याच स्टेडियम मधून ऑलिम्पिकची सुरवात झाली होती.

.

तिथून आम्ही नॅशन्ल गार्डन ऑफ अथेन्सच्या बागेतून रमतगमत Apollonosला आलो आणि मस्तपैकी एका हॉटेलात जेवलो. जेवण झाल्यावर आम्ही थेट हॉटेल गाठले आणि अंघोळ करुन ताजे तवाने होऊन हॉटेलच्या गच्चीवर म्हणजेच रुफटॉप गार्डनवर सहज चक्कर मारायला गेलो. आजचा दिवस मस्तं गेला होता , इतके फिरलो तरी थकवा अजिबात जाणवत नव्हता :)

गच्चीवरून अम्हाला खुणावत होता तो Lycabettus डोंगर.

.

उद्या सकाळी Lycabettus डोंगर बघायला जायचे होते :)

क्रमशः