Wednesday, 28 October 2020

लॉकडाऊनचे दिवस २०२० - भाग ३

 तर या लॉकडाऊनमध्ये अहोरात्र काम करणार्‍या NHSच्या कामगारांचे खूप मोठे योगदान होते / आहे. आपल्या मुलांना डे केअरला सोडून कोविड व इतर रुग्णांच्या सेवेसाठी ते कायम हजर असायचे. त्यांच्या व इतर एसेंशियल कामगारांसाठी दर गुरुवारी आठ वाजता पाच मिनिटांसाठी टाळ्या वाजवल्या जाई, घंटानाद होई. त्या दरम्यान आमच्या गल्लीतले काहीजण बाहेर रस्त्यावर येऊन टाळ्या वाजवी तर काही आमच्यासारखे खिडकीत उभे राहून वाजवी. त्याच वेळी आम्ही सगळेजणं एकमेकांना हात करून विचारपूस करत असू. माझ्या खास मैत्रिणीचे मामा इंग्लंडमध्ये पीडॅट्रीशियन होते. वय वर्ष ६८ असतानादेखील या कठीण काळात त्यांनी कोविड पेशंट्स ही सेवा केली पण दूर्दैव असेकी त्यांना याच विषाणूची लागण झाली आणि ते गेले. फार वाईट वाटले. जिथे डॉक्टर्स रुग्णांचे प्राण वाचवण्याचे अथक प्रयत्न करत होते तिथे अनेकजण दगावले देखील होते. अनेक मदतीचे हात धावूनही आले होते. जे वृद्ध आहेत, एकटे राहतात त्यांच्याशी फोनवर गप्पा मारण्यासाठी, त्यांना वेळ देण्यासाठी अनेक Volunteers उभे राहिले. आमच्या गल्लीत राहणार्‍या एका कुटुंबाने घरोघरी चिट्ठ्या टाकल्या, कुणाला वाण-सामान, औषधं किंवा गरजेच्या वस्तू हव्या असल्यास अमुक नंबरवर संपर्क करावा. ते आणून दारात ठेवतील,  काही लोकांची ही चांगली बाजून देखील दिसली. 

लॉकडाऊनची घोषणा झाली आणि मला फार मोठ्या अनुभवातून जावे आगले. मार्च अखेरीस माझा दात फार दुखायला लागला. बरे कुठे कॅव्हिटी आहे आणि दुखतोय तर समजले, हे म्हणजे फिलिंग केलेला दात अतिप्रमाणात दुखू लागला, गालावर सूज आली. इथे सगळचं बंद, डेंटिस्टचा चेक-अपसाठी बोलावण्याचा प्रश्नचं नव्हता आणि मी दुखण्याने बेजार झाले होते. पहिले एक-दोन दिवस पेनकिलर घेतल्या तेवढ्यापुर्ते बरे वाटे पण पुन्हा दुखू लागे. मागच्या गल्लीतच आमचा डेंटिस्ट आहे आणि तिथे दोन तर भारतीयच डेंटिस्ट प्रॅक्टिस करतात. त्यांना फोन लावला, तर आधी काय होते, किती दुखते, पेन कसं होते, एक्स्प्लेन करा म्हणून सांगितले मग ही सर्व माहिती माझ्या डेंटिस्टपर्यंत पोहोचवली. मग मला त्याचा थोड्यावेळाने फोन आला आणि सर्व त्रास समजून त्याने मला पेनकिलर घे, दात २-३ वेळा ब्रश कर, सॉल्ट वॉटरने रींस कर, फ्लॉस कर as normally you would असे सांगितले. 

मी त्याला खूपदा सांगितले की मी सर्व काळजी घेऊन दवाखान्यात येते तू एकदा बघ पण त्याने सांगितले की  नव्या गाईडलाईंस प्रमाणे  पर्सनली कुणालाच बघायचे नाही असे कळवले. मग ४-५ दिवस दुखर्‍या बाजूने खाणे बंद केले बाकी ब्र्शींग, फ्लॉसींग, रींसीग सूरुच होते.  दिवसा पॅरेसीटेमॉल घेऊन कोल्ड कम्प्रेस वापरून दिवस ढकलायचे रात्री पेनकिलर घ्यायचे, मला पेनकिलरचा मारा नको होता. एक आठवडा झाला तरी काही दुखायचे थांबेना, भारतातल्या डेंटिस्ट मैत्रिणीलाही फोन करून झाले होते पण माझ्या दातदुखीवर सध्यातरी काहीच करण्यासारखे नव्हते. शेवटी NHS111 वर फोन केला. तिथल्या डॉक्टरने वेगळ्या पेनकिलर व अँटिबायोटीक्स प्रीस्क्राईब केले व डे अँड नाईट फार्मसीमधून पिक करायला सांगितले. तो ही एक आठवड्याचा कोर्स होता. तो कोर्स पूर्ण झाला. औषधे थांबली की दुखणे सुरूच, जाम वैतागले होते मी या लॉकडाऊनला. 

शेवटी पुन्हा माझ्या डेंटल सर्जरीला फोन केला, तिथल्या सिनियर डॉकटरशी बोलले. तिने मला अजून एक आठवड्याचे अँटीबायोटिक्स प्रीस्क्राईब केले मी कप्पाळावर हात मारला, आलिया भोगासी असावे सादर. असा हा कोर्स संपेपर्यंत एप्रिलचा तीसरा आठवडा उगावला आणि माझी दातदुखी मिरॅक्युलसली थांबली. तरी प्रिकॉशन म्हणून मी त्याबाजूने खाणे थांबवले होते. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मला फॉलोअप कॉल आला आणि सांगण्यात आले की सर्जरी उघडताच मला इन पर्सन तपासण्यात येईल.  पुढे जेव्हा जून महिन्यात सर्जरी फक्त प्रॉयॉरीटीवर असणार्‍यांना बघण्यासाठी उघडली तेव्हा मला बोलावण्यात आले . सर्जरी अपॉईंटमेंट मिळाली, ठरलेल्या वेळी मला सर्जरीच्या बाहेर उभे रहायला सांगण्यात आले. आपण आल्याचा फोन त्यांना करून कळवायचे होते तसे केले. नर्स दारात येऊन आधी तुमचे टेंपरेचर चेक करते, हातावर सानिटायझर देते. त्यानंतर ती तुम्हाला पायात चढवायला डिस्पोझेबल ओव्हरशूज देते, मास्क किंवा फेस शिल्ड अगदी गरजेचे. त्यानंतर डेंटिस्ट तुम्हाला तपासतो. पण या दरम्यान हा जो काही वैद्यकीय अनुभव मला आला, जो मनस्ताप झाला तो न विसरण्याजोगा आहे. लॉकडाऊनमध्ये बाबा कधी कुणाला दाताचे दुखणे उद्भवू नये रे देवा.

४ जूनपासून लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले. हॉटेल्स, पब्स, फुड डिलिव्हरी, टेकअव्हे सुरु करू शकतात असे सांगण्यात आले. हॉलिडे होम्स, कॉटेजेस, कॅरॅव्हॅन पार्क्स सोशल डिस्टंस पाळून उघड्ण्यात आले. पार्क्स सुरु झाले तरी इन-डोअर सॉफ्ट प्ले एरीया, स्विमींग पूल्स,जीम बंद होते.  दुकाने सुरूच होती आणि आम्ही ऑनलाईन गोर्सरी मागवत होतोच. एका मित्राने सप्लायरशी बोलून त्यांच्याकडे भारतीय भाज्या, आंबे मोठ्या प्रमाणात मागवायला सुरू केले. त्यामुळे आपल्याला हवे त्या भाज्या, हापूस, केसर आंबे आम्ही जाऊन त्याच्याकडून पिक करत असू. काँटॅक्टलेस व्यव्हार असल्यामुळे सोपे जात होते. 


बहुतेकांनी या काळात वेळ जायला घरात रंगाची,  डागडूजी  (स्वतः करत), बागकाम करायला सुरूवात केली. या वर्षी तर आम्हाला भाज्या, फळझाडं लावायला माती, बियांसुद्धा मिळाल्या नाही. 

हळू-हळू गर्दी वावाढूलागली. इकडच्या लोकांना बीच हॉलिडेचे वेध लागले होते बिन्डोक कुठचे. असे वावरत होते जणू कोरोना केव्हा पळून गेला. यांच्या या अशा वागण्यामुळे आता पुन्हा युकेमध्ये केसेस वाढू लागल्यात. काही लोकांच्या बेफिकीरीमुळे बाकीचे लोकं निषकारण suffer करतायत. शाळा २ सप्टेंबरपासून सुरू झाल्या आणि शाळेत केसेस दिसू लागल्या तरीही सरकारचे पहिले पाढे पंचावन्न. कधी समजणार आहे यांना की लॉकडाऊनची गरज आहे. ज्या रेटने केसेस वाढतायत त्याने भीती वाटू लागली आहे. अक्टोबरला हाफ टर्म हॉलिडे सुरू होतील तेव्हा कदाचित बंद करतील अशी चर्चा  आहे पण तोपर्यंत काय? देवा हे कोरोनाचे संकट समूळ नष्ट होऊ दे बाबा आता. न्यु नॉर्मल म्हणत लोकं जगतायत पण पूर्वीसारखे मोकळेपणे वावरायला, एकमेकांना भेटायला, आपल्या माणसांसोबत रहायला लवकरच सर्वांना मिळू दे, हे जग पूर्वीसारखेच सुंदर बनू दे, मोकळ्या हवेत सर्वांना श्वास घेता येऊदे हीच प्रार्थना. 





Wednesday, 21 October 2020

लॉकडाऊनचे दिवस २०२० - भाग २

 लॉकडाऊनची घोषणा इथल्या सरकारने अमंळ उशीराच केली. त्याआधी नुसते जनहीत में जारी सूचना देत बसले.

२७ मार्च दरम्यान इथले पंतप्रधान बोरीस जॉन्सन, प्रिंस चार्ल्स व हर हायनेस राणी सरकार यांना कोरोना झाल्याची बातमी आली. बोरीस जॉन्सन तर अतिदक्षता विभागात अ‍ॅड्मिट असल्याचे वृत्त समजले आणि एकूणचं जनमासात एक भीतीची लहर उमटली. एकूणच चिंता वाढत होती, लागण झालेल्या रुग्णांची संख्या व डेथ रेट पाहता हे काही बरोबर दिसत नाही, धोक्याची चिन्हे दिसू लागली.

लॉकडाऊन खूप आधीच सुरू करायला हवे होते असे जनतेचे म्हणणे पडले पण ब्रिटीश  कारभार बघता काय बोलणार. 

शाळा बंद झाल्या असल्या तरी होम स्कूलिंग सुरु ठेवायचे अशी सरकारने मोहिम काढली. फ्रंटलाईन वर्कर्सची मुले यांच्यासाठी डे केअर, नर्सरी, शाळा सुरू ठेवल्या होत्या. ज्यांना वर्क फ्रॉम होम करता येण्यासारखे आहे त्यांनी ते करावे अणी ज्यांना बाहेर ऑफिसला जावे लागणार त्यांनी नॉर्म्स फॉलो करावे असे सरकारने सांगितले. जनतेला दिवसातून एकदा जॉगिंगला, वॉकला, सायकलिंगला बाहेर पडण्यास परवानगी होती. जिम, स्विमींग पूल्स बंद केले गेले.

लॉकडाऊन सुरु झाल्यावर इथल्या सरकारने कोरोना व्हायरस अ‍ॅक्ट २०२०पास केला. या कायद्याअंतर्गत सरकारने काही नियम बनवले ज्यात सरकारला डिस्क्रिशनरी पावर / अधिकार होता. कुठल्याही  पब्लिक गॅदरींगला परवानगी नव्हती तसेच पब्लिक ट्रान्सपोर्ट कंट्रोल किंवा निलंबीत करणे, दुकाने, रेस्टॉरंट्स अल्पकालीन सुरू-बंद ठेवायचे अधिकार त्यांनाच असणार होते,

याशिवाय या कायद्याचा फायदा भाडेकरू, एमर्जेन्सी स्वयंसेवक यांना झाला. हेल्थकेअर वर्कर्ससाठी स्पेशल इंश्युरंस कव्हर सुरु केले. छोट्या व्यवसायिकांचे आधीच फार नुकसान झाल्यामुळे इथल्या सरकारने फर्लो (Furlough) योजना राबवली. जे या योजनेत कव्हर होतात त्या कंपनी किंवा व्यवसायंकाच्या कर्मचार्‍यांचे ८०% वेतन सरकार देऊ करणार. तसेच कोरोनाला स्टेट्युटरी सिक पे मध्ये सामील करण्यात आले जेणेकरून ज्या व्यक्तिला कोरोनामुळे रजेवर जावे लागले त्याला पगार देणं कंपनीला भाग आहे हा नियम लागू झाला.

NHS नॅशनल हेल्थ सर्व्हिस वर कामाचे अधिक प्रेशर आले. त्यांचे ही बिचार्यांचे हाल सुरू होते. अधिक प्रमाणात येणार्‍या रुग्णांना बघणे हे मोठे काम. जीपी सर्जरी (दवाखाना) तर कुठल्याच रुग्णांना सर्जरीत येऊ देत नव्हती. अत्यावश्यक असल्यास त्यांनी सरळ NHS Emergency Number 111 वर संपर्क साधण्यास सांगितले. अगदीच वृद्ध असतील तर ते त्यांना फेस कव्हरींग घालून, अंतर ठेवून कंसल्ट करीत ते ही क्वचित. जीपी तर टेलिफोनीक अपॉईंटमेंट्स देत. त्यातल्या त्यात प्रीस्क्रिपशन थेट फार्मसीस्टकडे पाठवे किंवा टेक्स्ट मेसेजेसवर फोटो मागवी पण सर्जरीत येण्यास सक्त मनाई होती.  इथल्या वृद्धांवर बंधनं लावलीयत. प्रत्येक ज्येष्ठ नागरीकाची फोनवरून नियमीतपणे तपासणी होतेय. कामं खूप वाढल्यामुळे हॉस्पीटल्समधे निवृत्त झालेल्या स्टाफ, डॉक्टर्सना पुन्हा बोलावले गेलेय. 

फार्मसीबाहेर मास्क सक्तीने वापरायचा व २ मीटर अंतर राखून लाईन लावावी लागे. एकावेळी एकाला आत प्रवेश असे. इतरवेळी रस्त्यांवर गाड्यांचा गजबजाट असे पण आता त्याच रस्त्यावर शुकशूकाट असे.

सूपरमार्केट्स सुरू होते. त्यातही जे वल्नरेबल, वृद्ध, अपंग आहेत त्यांच्यासाठी सकाळचे स्लॉट्स ठेवण्यात आले जेणेकरून इतर लोकांची गर्दी होणार नाही. हेच NHS कर्मचार्‍यांना त्यांचे कार्ड दाखवले तर विना रांग प्रवेश मिळत असे. त्यांच्यासाठी काही सूपरमार्केट्सने वेगळे तासही ठेवले होते. लॉकडाऊनच्या धास्तीने लोकांनी अगदी वेड्यासारखे किराणा भरायला सुरू केले, काही ठिकाणी त्यामुळे सामानाचा तुटवडा होऊ लागला. म्हणून मग सूपरमार्केट्सनी एका वेळी दोनच वस्तू घेता येतील अशी बजावणी केली. आमच्यासारखी इतर अनेक लोकं ऑनलाईन ग्रोसरी मागवू लागली. त्यासाठी पण अनेकवेळा ऑनलाईन क्यु असे. काही काही वेळेला आम्ही दोन वेगळ्या सूपरमार्केट्सच्या साईटवर वेगळ्या तारखांसाठी क्यू लावत असू. एकदा का या आठवड्याचे सामान भरले की लगेच पुढील आठवडा किंवा त्यानंतरच्या उपलब्ध तारखांच्या हिशोबाने सामान बुक करत असू. सामान ज्या दिवशी डिलीव्हर होणार त्यादिवशी आमचे दोन तास पुढच्या साफ सफाईमध्येच जात.

डायनिंग टेबलचे दोन भाग केले. एका भागात आलेले सामान ठेवले जाई. भाज्या-फळं काढून मीठ घातलेल्या पाण्यात ३० मिनिटे बुडवून मग स्वछ धुवून, साफ करून, कोरडे करून स्टोअर केले जाई. कॅन्स, टीन्स डीसइंफेक्टंट स्प्रे वापरून वाईप्सने साफ करून ४८ तासांसाठी वेगळे ठेवले जाई. फ्रीजमधल्या वस्तूंना साफ करून ४८ तास हात न लावता तसेच फ्रीजमध्ये ठेवत असू. बिस्किटं, ब्रेडचे पॅकेट्सचे पण तसेच. कार्डबोर्ड बॉक्स ना तर साफ करून ७२ तास स्पर्श करत नसू. या सर्व तामझामनंतर डायनिंग टेबल, दरवाजेचे हँडल्स क्लिनींग करणे गरजेचे डिलिव्हरी करणारा तर दारात सामान ठेवून निघून जात.

 हे लॉकडाऊन जर थंडीत असते तर एकवेळ काही वाटले नसते पण हे ऐन वसंतात सुरू झाले, उन्हाळ्याची चाहूल लागत होती, दिवस मोठा होत होता. हवा गुलाबी होती, बाहेर वातावरण प्रसन्न होते पण ते एंजॉय करता येणार नव्हते. अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. आमच्या शेफिल्डच्या मराठी मंडळाचा मोठा गुढीपाडव्याचा कार्यक्रमही पुढे ढकलत ढकलत शेवटी रद्द करावा लागला. हिंदू मंदिरात होणारे होलिका दहन व धुळवडीचे प्लान रहित केले गेले.

आमच्यासाठी खरे चॅलेंज होते ते सव्वा चार वर्षांच्या दोन मुलांना लॉकडाऊन काळात कसे बिझी ठेवायचे. खरंतर मुलांना बाहेर फार आवडतं. त्यांनी कधीच नर्सरीला जाण्यास कंटाळा नाही केला. अशात स्वप्निल वर्क फ्रॉम होम म्हणजे तो एकदा का ब्रेकफास्ट झाला की स्टडीमध्ये जाऊन बसे आम्ही तिघे खाली आज काय करावे बरे याचा विचार करीत बसू. दरवर्षी आजी-पप्पा येतात ते आता कधी येणार असे विचारून भंडावून सोडले होते. रोज उठून आजी-पप्पांची आठवण बाळं काढत तिथे मम्मी-पप्पा यावर्षी येऊ शकत नाही म्हणून हळहळत होते त्यांना बाळांची फार आठवण येत. आकाशात विमान दिसताच बाळं विचारी यात आजी-पप्पा आहेत का? त्यांना नाही म्हणायला मला फार जड जाई. व्हिडियो कॉल्सवर समाधान होत नसे, ते चौघे (मम्मी-पप्पा,विवान रियान)एकमेकांना खूप मिस करत.  

ते काही नाही मला काहीतरी शेड्यूल ठरवायलाच हवे नाहीतर हे फार जड जाणार हे माझ्या लक्षात आले. टाईमटेबल फॉलो न करता खेळीमेळीने कसे बिझी ठेवायचे याचा विचार सुरू झाला. नर्सरीत  या दरम्यान स्कूल रेडीनेस उपक्रम सुरु होणार होता. नव्याने शाळेत  जाणाऱ्या पाल्यांना आपले नाव लिहियाला शिकवणार होते त्याचबरोबर अक्षर ओळख,  आकडेमोज शिकवणार होते. तसे तर हे गेल्या वर्षापासूनच शिकवायला सुरु केले तरी आता शाळेसाठी प्रीपेअर करायचे म्हणून त्यावर भर होता. फिल्ड ट्रीप होणार होती मुलांची. ट्रॅफिक लाईट्स कशासाठी असतात, रस्ता क्रॉसिंग, मॉल-व्हिजीट असे होणार होते. पण आता नर्सरी बंद असल्यामुळे हे सर्व मुलांना शिकवता येणार नव्हते म्हणून नर्सरीही ईमेलवरून त्यांच्यासाठी घरात करता येईल अशा अ‍ॅक्टीव्हिटीज पाठवत. 

मुलांना रोज सकाळ - संध्याकाळ अक्षर गिरवायला द्यायला सुरुवात केली. इथल्या शाळेत रोज मुलांना अटेंडेंस म्हणू आपले नाव लिहून एंट्री होती. आमच्या बाळांना ते लिहिता येतचं पण ते विसरू नये म्हणून रोजच्या रोज ते लिहून घेणं सुरु होते. नुसता अभ्यास करून कंटाळू नये म्हणून कधी त्यांना घराच्या बागेत शेडला कागद चिकटवून मनसोक्त पेंटिंग करायला दिले. स्प्रिंग क्लिनींगची आमची कामे होतीच. आम्ही गार्डन शेड , फेंस पेंट करत असताना त्यांनाही आमच्यात involve केले. त्यांनी त्यांच्या वयाच्या मनाने जे फराटे मारले ते आम्ही मग रंगवून कव्हर केले पण त्यांना ही पारीवारीक अ‍ॅक्टिव्हिटी करायला फार मज्जा आली. 

कधी ते बागेत प्लेटाईमदरम्यान बबल्स उडवण्यात मग्न होत तर प्लेडोसोबत खेळत. नर्सरीने त्यांना मेझरींग वीथ हँड्स, वर्म्स अ‍ॅक्टिव्हीटी, ईटींग दी रेनबो, क्रिएटींग नेम्स वीथ पेब्ल्स असे अनेक उपक्रम दिले होते. त्याशिवाय जगभरात फ्रंटलाईन वर्कर्ससाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यसाठी, या कठीण काळात आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत म्हणून क्वारंटीन विंडो रेनबोज काढून आपल्या खिडकीवर चिकटावायचे होते. आम्ही मुलांना या उपक्रामात भाग घेण्यास सांगितले  आणि त्याप्रमाणे त्यांनीही इंद्रधनुष्य काढून खिडकीवर चिकटवले. आमच्या गल्लीत व इतर गल्ल्यांमध्येही घरांच्या खिडक्यांवर असे रेनबोज आम्हाला बघायला मिळाले त्याचप्रमाणे काही लहान मुलांनी आपल्या ड्राईव्ह वेवर रंगीत खडूने, "We are together in this" असा संदेश लिहून एकमेकांना एन्करेज केले. 

असेच या विचित्र काळात नित्य नेमाने काम करणारे रॉयल पोस्टचे कामगार, रोज आपली पत्रं, पार्सले घरी आणून देणारे "पोस्टी" (पोस्टमन) यांचे आभार व्यक्त करण्यासाठी "Thumbs up for yor Postie" हा उपक्रम राबवला. त्यात लहान मुले  thumbs up  चे चित्र किंवा पोस्ट्बॉक्सचे चित्र रंगवून आपल्या मेन डोअरवर चिकटवून त्यांना धन्यवाद व्यक्त करत. काहीजणांनी तर पोस्टीसाठी दारा बाहेर सॅनिटायझर, वाईप्ससुद्धा ठेवले होते. या सर्वात आमच्या मुलांना भाग घ्यायला खूप मजा आली.  

मला विविध पदार्थ बनवायला आवडतात तर या दरम्यान मुलांनाही त्यांना जमेल ते पदार्थ बनवायला शिकवले ते ही त्यांना आवड दिसतेय हे समजून. बाळांनी  CookwithV&R याखाली कुकीज, गुळ तूप पोळी, केक, फ्रुट सॅलॅड, नानकटाई, मग केक्स, न्युटेला बनाना रोल अप्स, फ्लारलेस कूकिज असे अनेक पदार्थ बनवले. मी त्यांनी तयार केलेल्या पाककृतींचे क्वारंटीन आठवण म्हणून सचित्र पुस्तक तयार केले आहे.

कधी मी त्यांना लहान मुलांचे चित्रपट ३० मिनिटे स्क्रिइन टाईम लावून बघायला देत असे. हायडी, कार्स, पीटर-पॅन हे कार्टूनमय चित्रपट त्यांनी एंजॉय केले तसेच गोष्टीची पुस्तके वाचून दाखवणे, बागेत पॅडलिंग पूल तयार करून स्विमिंग करणे, त्यांना घेऊन दूर टेकडीवर वॉकसाठी जाणे, पुढल्या दारी एका लिमिटेड एरियात स्कुटर चालवयला देणे हे करू लागले. या अशा काळात मला यांना कसे बिझी ठेवायचे असा प्रश्न पडला असताना बाळांनी छान कोऑपरेट केले. सुरुवातीला रोज उठून नर्सरीच्या कपड्यांचा सेट ते दोघे तयार करत आणि आम्ही त्यांना आपण बाहेर जाऊ शकत नाही हे सांगत असू. कारण विचारता बाहेर मॉनस्टर आहे असे आधी सांगितले पण मग विचार केला त्यांना समजेल अशा भाषेत खरे काय आहे ते सांगितले पाहिजे. बाहेर व्हायरस आहे, व्हायरस म्हणजे काय, त्यासाठी काय काळजी घ्यावी हे त्यांना सांगितले. कोरोनावर आलेले बेबी राईम्स दाखवले, लहान मुलांना सांगता यावे म्हणून पुस्तिका आणून वाचून दाखवले. त्यांनी या दरम्यान क्राफ्ट्स ही खूप केले त्यामुळे एकंदरीत सूपर अ‍ॅक्टीव्ह मुलांना बिझी ठेवण्यात मला यश प्राप्त झाले होते.


पुढच्या भागात लॉकडाऊन दरम्यान आलेला वैदकीय अनुभव आणि इतर गोष्टींविषयीचा लेख असेल.

🖋सानिका





Wednesday, 14 October 2020

२०२० लॉकडाऊनचे दिवस - भाग १


लॉकडाऊनच्या काळातील आमचे अनुभव, त्या दरम्यान इथे अमलात आणलेले नियम याबद्दल या हा लेख लिहिण्याचा प्रयत्न केलाय. लेख एकत्रितपणे लिहिला तर फारचं लांबेल म्हणून भागांमध्ये लिहिण्याचे ठरवले आहे. 


 डिसेंबर २०१९ ला फेसबुकच्या एका कम्युनिटी पेजवर एका बाईने अमेरीकेहून भारतात व्हाया चायना जाणार्‍या विमानाबद्दल चौकशी केलेली आणि त्यावर अनेकांचे उत्तर व्हाया फ्लाईट न घेणे, दुसरा पर्याय निवडणे हे वाचले. असे का बरे सांगत आहे म्हणून शोधले तर चायनामधील वुहान शहारत कुठल्यातरी व्हायरसने थैमान घातल्याचे वृत्त समजले. बातमी वाचून मी फार खोलात न जाता सोडून दिली. जस-जसे दिवस पुढे जाऊ लागले तसे या व्हायरसबद्दल बर्‍याच बातम्या कानी येऊ लागल्या. जानेवारी महिन्यात तर या कोरोना व्हायरसबद्दल अनेक बातम्या, चर्चा वाचायला, ऐकायला मिळाल्या. या साथीची सुरुवात चीनच्या वुहान शहरातून सुरू झाली आणि जोपर्यंत या व्हायरसबद्दल जगाला समजलं तोपर्यंत अनेक प्रवासी इतर देशांत पोहोचले होते. सुरुवातीला सार्स किंवा मर्ससारखा वाटणारा हा विषाणू जेव्हा खरेतर वेगळा आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये जी भीती निर्माण झाली त्या कोरोनाचा हळू हळू होणारा पसर, प्रादूर्भाव वाढत चाललाय आणि बर्‍याच देशांची धांदल उडतेय हे सांभाळाण्यात हे स्पष्ट दिसत होते.

अजूनही इंग्लंडमध्ये कोरोनाची लागण कुणास झाली नव्हती. पण युरोपात या व्हायरसने शिरकाव केल्याचे समजले आंतरराष्ट्रीय विमानतळं काही ठिकाणी उड्डाणे रद्द करत होती तर कुठे बॉर्ड्रस बंद करण्यचे ठरत होते. इंग्लंडचे सर्वात मोठे हब म्हणजे हिथ्रो विमानतळ जेथून हजारो विमाने रोज टेक-ऑफ, लँड करत असतात. 

आम्ही आपले अजूनही सोशल गेट-टुगेदर्स करत होतो... अगदी बिंधास्त. जानेवारीत संक्रांतिचे हळदी-कुंकू व पॉटलक पार्टी साजरी करत असताना या व्हायरसबद्दल गप्पादेखेल मारल्या. खरंतर आमचे पुढचे गेट-टुगेदर ही ठरले होते. दुसर्‍या फ्रेंड्सर्कलबरोबर इथे मार्चमध्ये येणार्‍या ईस्टर लाँग विकेंडला फ्रांसला डिस्नेलँडला मुलांना घेऊन जायचे ठरत होते. पण तोपर्यंत फ्रांस, स्पेन, इटलीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आणि मग आम्हाला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. आमचा प्लान होल्डवर ठेवून पुढे काय होते यावर लक्ष केंद्रित केले. फेब्रुअरी उजाडला आणि इथल्या शाळेत टर्म हॉलिडेज सुरु झाल्या ज्यामुळे स्थानिक लोकं फिरायला जाऊ लागले, त्यातले काही इटली, स्पेनलाही गेले आणि तिथून, एकूणच इंग्लंडमध्येही कोरोना व्हायरस तोपर्यंत पोहोचला होता.

खरंतर २८ फेब्रुअरीला युकेतील पहिली केस आढळली पण इथल्या सरकारने हर्ड इम्युनिटीच्या नादापायी सगळ्याच बाबतीत दिरंगाई केली. तिथे इटली, स्पेनची परिस्थिती बघता सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. तेथील व्हिडिओज पाहून अंगावर काटा येत असे. घरात कोंडलेल्या लोकांचे अनुभव ,हाल बघवत नव्हते. युकेतील जनता सरकार लॉकडाऊन कधी करणार याकडे लक्ष ठेवून होते. सर्वांचे धाबे दणाणले होते. भीती, काळजीमुळे हैराण झाले होते.

आम्ही जागतिक महिलादिनाचे आमचे गेट-टुगेदर ठरल्याप्रमाणे ७ मार्चला करणार होतो, त्यासाठी कुटुंबासमवेत बाहेर डिनर करायचे ठरले होते. ते आमचे २०२०मधले शेवटचे एकत्रीतपणे झालेले गेट-टुगेदर. तोपर्यंत हँड सॅनिटायझर, मास्क, ग्लव्हजचा वापर लोकं फार करत नव्हते तरी सेफ्टी म्हणून आम्ही सॅनिटायझर आणि काही प्लॅस्टिक बॅग्ज सोबत घेऊन गेलो होतो. त्यावेळी एकमेकांना मिठी मारून एकमेकांचे केलेले स्वागत चालत असे. 

आमची एक मैत्रिण जीपी आहे. तिचे म्हणणे होते अजिबात पॅरॅनॉईड होऊ नका, संयमाने घ्या. जे सेफ्टी मेजर्स घ्यायचे ते घ्या पण असे घाबरून जाऊ नका.  इथे बाळांची नर्सरी सुरू होती, स्वप्निल कामानिमित्त दुसर्‍या शहरात असे तो विकेंडला घरी यायचा. तर आठवडाभर दोन मुलांना घेऊन या कोरोनाच्या काळात कसे रहायचे या विचारांनी भंडावून सोडले होते. त्यातल्या त्यात बाळांना नर्सरीतून पिक करताना त्यांच्या हातावर सॅनिटायझर लावायला सुरुवात केली. कारमध्ये घरी येईपर्यंत त्यांना स्नॅकबार किंवा छोटा खाऊ लागत असे तो देण्यास बंद केला. काही-बाही सांगून त्यांना समजावले होते. घरी येऊन हातपाय धुण्याऐवजी थेट बाथरूममध्ये अंघोळीसाठी जायचे हे सांगितले. मुलेही छान कोऑपरेट करत. 

आताशी लोकांमध्ये पॅनिक बाईंग सुरु झाले होते. लॉकडाऊन सुरू झाले तर किती काळ चालेल माहित नसल्यामुळे लोकं  मोठ्या प्रमाणात अत्यावश्यक गोष्टी, ग्रोसरी स्टॉक करु लागली. 

मी मुलांना नर्सरीला सोडून बाजूलाच असलेल्या सूपरमर्केटमधून जमेल तसे जास्तीचा किराणा भरायला सुरु केला होता. कडधान्यांचे टीन्स, न्युडल्स, मैदा, डाळी, कणिक, तांदूळ, मसाले, जॅम, बटर, चीझ, चीझस्प्रेड. तसेच भारतीय ग्रोसरी दुकातून वेगवेगळी पिठं, गीट्सची पॅकेट्स, फ्रोझन मिक्स्ड व्हेजिटेब्लस (अगदीच भाज्या नाही मिळाल्या तर), बीन्स, मटार भरून ठेवले होते. स्वप्निलदेखिल विकेंडला येताना तिथल्या दुकानात मिळणारे सामान आणत असे. कमीत कमी २ महिने तरी सामान पुरणार होते.  लहान मुलं असल्यामुळे त्यांचा खाऊ, औषधं, वाईप्स, पुस्तके,अ‍ॅक्टिव्हिटीज सेट्स असे जमा केले होते.  उद्या जर लॉकडाऊन सुरु झाले तर दूध, अंडी, बेक्रीचे सामान कसे मागवायचे हा प्रश्न होताच. ऑनलाईन सामान मागवायला स्लॉट्स सहसा मिळत नसे. त्यासाठी ऑनलाईन रांग लावावी लागे, बाळं असल्यामुळे दुध तर लागणारचं होते. शेवटी डेअरीतून दूध घरपोच मागवायचे ठरवले त्यासाठी डेअरीवाल्याला फोन केला तर समजले त्याच्याकडे आधीपासूनच नवीन गिराईकं आलियत आणि बाहेर पडायला लागू नये म्हणून खूप प्रमाणात लोकं हा पर्याय निवडत आहे. त्यामुळे अनेक फोन करूनही आम्हाला काही घरपोच दूध डिलेव्हर करणारा कुणी सापडेना शेवटी एकदाच जाऊन जास्तीचे दूध आणून ठेवायचे ठरवले.

लॉकडाऊन अजूनही सरकार ने सुरू केले नव्हते. खरंतर इथले वैज्ञानिक मार्चच्याआधीपासूनच लॉकडाउनची मागणी करत होते पण सरकार काही केल्या तयार होईना. युरोपात बर्‍याच देशात लॉकडाऊन केव्हाच सुरू झालेले. युके सरकाराची त्याबद्दल खिल्लीही उडवली गेली. आम्ही मैत्रिणी मुलांना शाळेत, नर्सरीला पाठवायचे का नाही याबद्दल चितींत होतो. 

१३ मार्चच्या शुक्रवारी स्वप्निल घरी आला ते सांगत की त्यांच्या ऑफीसने वर्क फ्रॉम होम करायला पर्मिशन दिली आहे. त्यामुळे मला हायसे वाटले. पण तरी अजून एक प्रश्न डोक्यात सुरूच होता, मुलांची नर्सरी, ती तर सुरूच होती. सोमवारी मुलांना नर्सरीला सोडले खरे आणि घरी येऊन मॅनेजरला ई-मेल करून ते काय करणार याबद्दल विचारले. मॅनेजर जोच्या म्हणण्यानुसार नर्सरी अजूनतरी सुरू राहणार होती जोपर्यंत सरकार काही निर्णय देत नाही तोपर्यंत तरी. आम्ही दोघांनी शेवटी ठरवले मंगळवारपासून आपण मुलांना पाठवायचे नाही आणि तसे नर्सरीला कळवले.

इथे सरकारने शेवटी २० मार्चपासून शाळा बंद केल्या.  २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाले आणि एका वेगळ्याच अनुभवाला / बदलाला सामोरे जाण्यासाठी लोकं तयार होऊ लागली.