Friday, 23 April 2021

लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी रुजवा

 जागतिक पुस्तकदिनाच्या शुभेच्छा!!


मला वाचनाची आवड अगदी लहानपणापासून आहेच, माझ्या आईने मला अनेक गोष्टींची पुस्तकं आणून ही आवड माझ्यात रूजवली. तुम्ही इंग्रजी माध्यमात शिकत असलात तरी आपल्या मातृभाषेतील पुस्तके ही वाचता आलीच पाहीजे असे तिचे म्हणणे असायचे. तिला स्वतःला वाचनाची आवड आहे, माझ्या आजीलाही वाचनवेड  होतेच. माझ्या आजोळी घरातच, माडीवर मोठ - मोठी बुकशेल्व्स पुस्तकांनी भरलेली होती. माझे आजोबा, मोठी मावशी यांची अनेक पुस्तकं संग्रहीत होती, जी आम्ही कालांतराने त्यांच्या शाळेला दिली. माझ्या इतर मावश्यांनाही ग्रंथवेड आहे.  बालपणी प्रत्येक सुट्टीत ठकठक, चंपक, चांदोबा, टिंकल, चाचा चौधरी, इसापनीती, पंचतंत्र, फेअरी टेल्स, लोटपोट, टेनाली रामन, अक्बर -बिरबल, अमर चित्रकथा, फँटम, आर्ची  इत्यादी मराठी - इंग्रजी - हिंदी पुस्तकं आईने आणून दिलीत त्यामुळे आपसूकच मला ही वाचनाची सवय  लागली. मला  लायब्ररी लावून दिली होती तसेच शाळेतून पण मी पुस्तकं आणायचे, आईसुद्धा तिच्या शाळेतून वाचायला अनेक पुस्तकं घेऊन यायची. हळू-हळू पुस्तकांचा सग्रंह होऊ लागला, त्यातच युकेला येताना माझ्यासोबत माझी काही पुस्तकं आली आणि आता तर अनेक वर्षांनी माझी सर्व पुस्तकं भारतातून माझ्या घरी कायमस्वरूपी राहण्यास आलीयत. 

आता माझी मुलंदेखील वाचनाचा आस्वाद घेत आहेत, त्यांच्यात ही आवड  माझ्या आईनेच ते लहान असताना अनेक गोष्टी सांगून निर्माण केलीय. बाळं अगदी वर्षाची असताना त्यांना मी म्युझिकल पुस्तक आणले होते. त्यांच्या वाढदिवसालाही त्यांना म्युझिकल बेबी राईम्स चे पुस्तक मैत्रिणीने भेट दिले होते. त्यातील गाणी ऐकून त्या तालावर दोघे अगदी छान डोलायचे. पुस्तक उघड - बंद करताना त्यांचे फाईन मोटर स्किल्स विकसीत व्ह्यायला मदतच होत असे. प्लॅस्टिकची जड पाने उलटण्याचा प्रयत्न त्यांची इवली - इवली बोटे करत. 

पुढे मी त्यांना कापडी पुस्तकं आणून दिली. प्रत्येक कापडी पानांवर विविध चित्र, पाने, फुले, फळं, भाज्या, प्राणी, जनावरे, गाड्या - विमानं, रोजच्या वापरातील वस्तूंचे चित्र, नावं अशी माहिती होती. त्या पुस्तकांना वर प्लॅस्टिकच्या रंगीत रींगांचे हँडल होते. त्यामुळे रंग ओळखायला शिकवणेही सोपे होत होते. त्या पुस्तकांचा स्पर्शदेखील  मुलायम असा. फार आवडायची ती मऊ - मऊ पुस्तकं दोघांना, मी अजूनही सांभाळून ठेवलियेत.

माझ्या जावेने त्यांना 'माय फर्स्ट लायब्ररी' असा हाताच्या पंजाएवढे पुस्तकांचा संच भेट दिला होता. प्रत्येक पुठ्ठ्याच्या पानावर एक प्राणी व त्याचे नाव असे होते. प्राणी, पक्षी, जनावरे यांची ओळख व्हावी म्हणून दिले होते. नंतर मला एका ठिकाणी सी, टच अँड फील अशी पुस्तकं मिळाली. त्यातल्या प्रत्येक गोष्टीतल्या पात्राचा एखादा विशिष्ट भागाला स्पर्श करून त्याचा पोत कसा आहे हे समजत असे. उदाहरणार्थ; युनीकॉर्नचे पंखं चमचमणार्‍या कापडाचे होते तर मानेवर रुळणारे केस मऊसूत फरपासून बनवलेले. खारूताईची शेपूट खरखरीत फरची तर बग्जच्या पुस्तकात प्रत्येक कीटकाच्या पोटाला, पंखाला स्पर्शकरताच त्यांचे वेगळेपण जाणवतं.

मग मी त्यांच्यासाठी क्वाएट बुक्स आणले. ही पण बर्‍याचदा कापडी असत. मुलं एखाद्या पझलप्रमाणे ते खेळत असत. वेलक्रो, किंवा लेसला जोडलेले पात्र, वस्तू असल्यामुळे  मुलं पुस्तकातील कापडी पझल पीस काढून पुन्हा जागेवर लावू शकतात. मेलिसा अँड डो यांचे लॕचेस बोर्डावर साखळी, कडी, लॕच असलेले दरवाजे मुलांना शिकवायला फार सोपे जाई. मोबाईल, टीव्हीपेक्षा मला या सेन्सरी बोर्ड्स, पुस्तकांचा फार उपयोग झाला. 

दोन वर्षांचे झाले तेव्हा मी त्यांच्यासाठी अ‍ॅलेक्स शेफलर्सची फ्लिप - फ्लॅप पुस्तकं आणली, त्यात ओशन, जंगल, फार्म, डायनॉसॉर्स अशी विविध पुस्तकं होती तसेच माय फर्स्ट वर्ड्स, नंबर्स अशी पुस्तकं ही खूप आणली.  त्यांच्या नर्सरीतून फिलिंग्ज, काऊंटिंग नंबर्सची पुस्तकं वर्ल्ड बुकडे निमित्त भेट देण्यात आली होती. चित्रकलेची तर अनेक पुस्तकं घरी आहेत आमच्या. माझ्या आईनेसुद्धा काही पाठवली त्यांच्यासाठी. याचबरोबर स्कूल रेडीनेस म्हणून मी त्यांचा अक्षरं गिरवायची पुस्तकं आणली होती राईट अँड वाईप ही तर सुपरहीट ठरली. प्लॅस्टिक शीट्स असल्यामुळे अक्षरं, अंक गिरवून तुम्ही पुसून त्याच पानांवर पुन्हा लिहू शकता. पेप्पा अ‍ॅक्टिव्हिटी जर्नल, डॉट टू डॉट, स्टीकर अ‍ॅक्टिव्हिटी बुक्स, मॅथ्स लर्निंग फन बुक्स अशा नाना प्रकारची पुस्तकं त्यांना बिझी ठेवायला मी अजूनही आणत असते.

आम्ही त्यांना २०२० च्या नाताळमध्ये पर्सनलाईज्ड पुस्तकं भेट म्हणून दिले. गोष्टीतले मुख्य पात्र ते स्वतः आहेत. आपली नावे वाचून त्यांना खूप मज्जा वाटली. आपण या पुस्तकात हिरो आहोत ही कल्पना  गंमतीशीर आहे . त्या पुस्तकांची आत्तापर्यंत अनेकवेळा पारायणं झालियत. त्यांना अजून पर्सनलाईज्ड पुस्तकं हवी आहेत, म्हटले,  यु हॅव टु वर्क हार्ड टु अर्न इट, देन ओन्ली ममा - डॅडा विल गेट मोअर फॉर यु :) 

आपल्या सणांची ओळख व्हावी  किंवा आपण ते का साजरे करतो याबद्दल मुलांना माहिती असावी म्हणून मी त्यांना फेस्टीव्हल स्टोरीज हे पुस्तक आणलेय. यात गोष्टीसोबत त्या त्या सणाची माहिती थोडक्यात सांगितलेली आहे. 

बेड - टाईम स्टोरीजमध्ये मी रोज रात्री त्यांना वेग-वेगळी पुस्तकं वाचून दाखवते. वयानुरुप पुस्तकं मुलांना घेऊन द्यावीत. त्यातील मजकूर मी स्वतः मोठ्याने, हावभाव करून वाचून दाखवते. त्यामुळे मुलांमध्ये उत्सुकता निर्माण होते, वाचलेल्या गोष्टीवरून त्यांना जे प्रश्न पडलेले असतात त्यावर आम्ही छान चर्चा करतो. त्यांचे प्रश्न अगदीच गोड असतात पण त्यांना उत्तरे देताना, समजावून सांगायला मला फार मजा येते. त्यांना त्यामुळे त्यांचे म्हणणे कम्युनिकेट करता येते. आपापसात खेळाताना ते कधी कधी स्टोरी सेशन असे खेळतात, स्वतः गोष्टं रचून एकमेकांना सांगतात.  

मैत्रिणीने मराठी गोष्टीची पुस्तकं भेट दिलियेत, त्यातील छोट्या - छोट्या गोष्टी मी मुलांना वाचून दाखवते, वाचते पण मराठीत आणि सांगते पण मराठीत त्यामुळे त्यांना किमान आपली भाषा समजते अगदी व्यवस्थित. मराठी शब्द ते बोलत असले तरी त्यांना संपूर्णपणे मराठी बोलता येत नाही, मी घाई करणार पण नाही, त्यांच्या कलेने त्यांना ही भाषादेखील बोलायला शिकवणार आहे, पण ते पुढे, one language at a time. रोजची प्रार्थना मात्र ते मातृभाषेत म्हणतात. 

शाळा सुरू झाल्यावर तर वर्गातच रीडिंग कॉर्नर असल्यामुळे शाळतेल्या टीचर्स त्यांना अनेक गोष्टींची पुस्तकं वाचून दाखवत. इथल्या शाळेचे हे मला फार आवडते, वाचनाची गोडी मुलांना लावतात. वाचन हे लहान मुलांच्या जडणघडणासाठी महत्वाचे आहे. नियमित वाचन केल्याने उच्चार स्पष्ट होतात, वाक्य रचता येतात, विविध गोष्टी ऐकून त्यांच्या कल्पनाशक्तिला वाव मिळतो. आपली पुस्तकं कशी जपली पाहिजे, त्यातून आपल्याला ज्ञान मिळते हा अनुभव त्यांना घेता येतो. शाळेतून पण मुलांना नाताळदरम्यान २-३ गोष्टीची पुस्तकं भेट म्हणून देण्यात आली.

आता लॉकडाऊनमध्ये होम स्कूलिंग मध्ये रोज एक सेशन स्टोरीचे असायचे. रोज एखादे गोष्टीचे पुस्तक टीचर वाचत, कधी कधी मुलांना  त्यांच्या आवडत्या पुस्तकाबद्दल विचारत तर कधी  त्यांना एखादी गोष्ट सांगून त्या गोष्टीचा मॅप काढायला सांगत, तर कधी अभिनय करून स्टोरी अ‍ॅक्ट करायला सांगत. We are Going On A Bear Hunt आणि Percy The Parkeeper या गोष्टींवर आधारीत शाळेत अनेक उपक्रम मुलांनी केले. शाळेने अनेक छान छान पुस्तकं ऑनलाईन मुलांच्या आफ्टरनून ब्रेकमध्ये बघण्यासाठी व्हिडियो लिंक्स पोस्ट केले आहेत. ५ - ८ मिनिटे गोष्ट ऐकण्यासाठी मुलंखील सज्ज होत. 

इच पीच पेअर प्लम - Janet & Allen Ahlberg

दी ट्रोल - Julia Donaldson

दी डे दी क्रेयॉन्स क्वीट - Drew Daywalt

दी रेनबो फिश - Marcus Pfister

बी काईंड  - Pat Zietlow Miller

जीराफ्स कान्ट डांस - Giles Andreae

दी स्मार्टेस्ट जायंट इन दी टाऊन - Julia Donaldson

मिसेस मोल, आय अ‍ॅम होम - Jarvis

क्लार्क दी शार्क - Bruce Hale

आय वाँट माय हॅट बॅक - Jon Klassen

दी थिंग अबाऊट स्प्रिंग - Daniel Kirk

दी लिटल रेड हेन - Jonathan Allen

एलियन्स लव्ह अंडरपँट्स - Claire Freedman

ग्रँडडॅड्स आयलँड - Benji Davies

अशा अनेक पुस्तकांचे व्हिडिओ लिंक्स युट्युबवर उपलब्ध आहेत. 

५ वर्ष हे महत्वाचे वर्ष आहे, या वयात मुलांना अक्षर ओळख, उच्चार,  अक्षरं शब्दात गुंफणे येऊ लागलेले असते. अशावेळीच त्यांना स्वतःहून दोन ओळी वाचायला प्रोत्साहन द्यावे. अगदी जबरदस्ती करू नये पण दोन शब्द तरी वाचायला द्यावे. इथे मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून फोनिक्स वापरून रोज थोडीतरी वाचायची सवय करावी असे शाळा सांगते. त्यांना वाचन करायला सोपे जावे, मदत व्हावी म्हणून मी त्यांच्यासाठी बॉब बुक्स घेऊन आले आहे . त्यातील छोट्या, चार चार ओळींच्या गोष्टी सहज वाचता येतात. फोनिक्स शाळेत शिकवतात, फोनिक्स प्ले म्हणून साईट आहे त्यावरही मुलांना बरेच अभ्यासाशी रीलेटेड गेम्स, वाचन करता येते. सोपे सोपे शब्द असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढू लागलाय. या सगळ्यात एक महत्वाची गोष्टं म्हणजे वाचनाची मुलांना गोडी जरूर लावावी पण त्यांना जबरदस्ती करू नये. त्यांना कुठली पुस्तकं आवडतात, कुठल्या लहान मुलांच्या गोष्टी वाचायला आवडू शकतात हे पहावे. त्यांना त्यांचे पुस्तक निवडायला द्यावे. आज काय वाचायचे हे त्यांना ठरवू द्यावे, एखाद्या पुस्तकाबद्दल त्यांना थोडी आधी माहिती द्यावी त्याने कुतुहल निर्माण होतं.

मलासुद्धा स्वतःसाठी पुस्तक खरेदी करताना मुंलासाठी खरेदी करायला फार आवडते. त्यांची अनेक जूनी पुस्तकं आम्ही चॅरीटीला दिलीयत कारण त्यांच्या संग्रहात वाढ होतच राहते, राहणार. रोज रात्री झोपताना  मुलांनाही आपण  कुठले नवे पुस्तक वाचणार म्हणून उत्सुकता लागून राहते. त्यांच्यामुळे मलासुद्धा रोज वाचन करायचेच हे पाळता  येतेय. पुस्तकांचे वेड हे गॅजेटच्या वेडापेक्षा बरे. लिमिटेड स्क्रीन्टाईम वेळेतच सेट करा म्हणजे त्यांना आपले छंद, खेळ, वाचन सारख्या गोष्टींना वेळ देता येईल,  नियमीत वाचनाने त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होते,  त्यांचा मानसिक आणि बौद्धिक विकास होतो. खरचं मुलांना खाऊ, कपडे, खेळणीसोबत एकतरी गोष्टीचे पुस्तक जरूर घ्या, कुठलेही छान गोष्ट असणारी पुस्तकं घ्या, त्यांना ती वाचून दाखवा, त्यासारखा दुसरा आनंद नाही. या वाचनमेव्याचा त्यांना ही  आस्वाद  घायला प्रोत्साहन द्या. 


























Tuesday, 6 April 2021

राणीच्या देशात - पॅडले गॉर्ज - पीक डिस्ट्रिक्ट

 ईस्टरचा लाँग वीकेंड - अनायसे वेदर खूप छान होतं. दिवसही  मोठा असल्यामुळे आम्ही आज मुलांना घेऊन पिकनीकला जायचे ठरवले. मुख्य हेतू वॉकिंग आणि निसर्गाचा आनंद उपभोगणे हाच असल्यामुळे आम्ही त्याच तयारीनिशी निघालो. फळं, सँडविचेस, पाणी आणि सिरीअल बार्स त्याच बरोबर फर्स्ट एड कीट बॅगपॅकमध्ये पॅक केले आणि  वॉकिंग शूज घालून आमची पलटण निघाली..... पॅडले गॉर्जला.


पॅडले गॉर्ज हे पीक डिस्ट्रीक्टमधले एक नयनरम्य ठिकाण आहे. घरापासून मोजून दहा मिनिटांच्या अंतरावर  असलेले. हा वृक्षमय परीसर बर्बेज ब्रुक ओढ्याने घेरलेला आहे. हे ठिकाण लाँगशॉ ईस्टेट्पासून अर्ध्या माईलवर तर ग्रींडलफोर्ड गाव,  रेल्वे स्टेशन  आणि A6187 रस्त्यामध्ये वसलेले आहे. तुम्ही ग्रींडलफोर्डला गाडी पार्क करून अप्पर पॅडलेवरूनही जाऊ शकता. आम्ही लाँगशॉच्या कार पार्कला गाडी पार्क करून तिथून पिंक रूट फॉलो करायला सुरू केले. खरतर वर्तूळाकार रूट आहे आणि फारसा वेळ लागत नाही, पण आम्ही एकूण साडेतीन तासात संपूर्ण रूट पूर्ण केला कारण वाटेत असंख्य फोटो स्टॉप्स आहेत आणि सभोवतालचे सृष्टी सौंदर्य पाहून खरोखरचं भारावून जायला होतं. मुलांना ही फार फार मज्जा आली, एकदम अ‍ॅडव्हेंचरस वाटले त्यांना. 

लाँगशॉचा बोगॉर्ट ट्रेल रूट फारच सुंदर आहे. दाट झाडी, तळे, तळ्यात विहार करणारी बदकं, डोळ्यांना निववणारी हिरवळ, दूरवर शेतात चरणारी मेंढरं, पक्ष्यांचा किलबिलाट, मोठ-मोठ्या ओकच्या झाडांचे बाकडेवजा ओंडके, ओंडक्यांना फेअरी हाऊससदृश्य कोरले गेलेय. तिथून पुढे चालत आले की लाँगशॉ लॉज दिसतं. हे १८२७ च्या काळात ड्युक ऑफ रटलँड यांनी बांधले. या वास्तूचा एक वेगळाच इतिहास आहे. ही वास्तू पहिल्या महायुद्धाच्या वेळी अनेक जखमी सैनिकांचे आश्रयस्थान ठरली होती.



फेअरी डोअर्स


लाँगशॉ लॉज


















बार्न

पुढे १/२ माईलचा रस्ता चालत आल्यावर आम्हाला लाकडी गेट लागले जे मुख्य रस्त्याकडे घेऊन जात होते, तिथेच एक ओपन बार्न आहे. आत बरीच वेगवेगळी माहिती असलेले बोर्ड्स आहेत. तिथेच एक मॅप सुद्धा आहे व बसण्यासाठी दोन बाकडी आहेत. पुढे आल्यावर गाड्याची रांग दिसते, हे रोडसाईड फ्री पार्किंग आहे पण इथे गाडी अगदी नीट पार्क करावी, इथले पोलिस फार कडक आहेत व लगेच फाईन लावण्यासाठी त्यांची पॅट्रोलिंग कार फिरत असते. रस्ता क्रॉसकरून आम्ही गेटमधून खाली उतरलो आणि आम्हाला तिथे बर्बेज ब्रुक ओढा दिसला. लोकं त्यात पाय सोडून बसलेले होते तर कुणी पाण्यात उतरले होते. बरीच लोकं किनार्‍यावर पिकनीक मांडून बसली होती. जवळचं असलेल्या लाकडी पूलावरून आम्ही पलीकडे गेलो व चालायला सुरुवात केली. 



पॅडले गॉर्जला जाण्यासाठी रस्ता


लाकडीपूल


बर्बेज ब्रुक


















एका बाजूला ओढा वाहतोय आणि एका बाजूला मोठ-मोठ्या पाषाणांनी सजलेला परीसर. पाषाणांवर शेवाळे होते त्यामुळे पिवळसर, हिरवट, करड्या रंगाचे खडकं त्या वनंस्थळी उठून दिसत होती. त्यावर चढून उड्या मारायला मजा आली. जस-जसे पुढे आलो तसे उजव्या बाजूला ओक आणि बर्चची मोठाली, वळणदार, जराशी आक्राळ - विक्राळ वृक्ष लक्ष वेधून घेत होती. मुलांना त्या झाडांवर चढायला भारी मजा वाटली. अगदी घनदाट जंगलाप्रमाणे परीसर होता, सूर्याची किरणंसुद्धा फांद्यांशी लंपडाव खेळत खाली पोचत होती. निरव शांतेत पक्ष्यांचे कूजन स्पष्ट ऐकू येत होतं. डाव्या बाजूला वाहणार्‍या ओढ्याचे खळखळणे अगदी जीवाला शांत करणारे, संतुष्ट करणारे होते. पुढील वाट ही जरी खडकाळ असली तरी कठिण नव्हती. एका ठिकाणी येताच आम्हाला एक झाड दिसले ज्यावर अनेक पेन्स  (कॉईन्स) ठोकलेले दिसले, ते पाहून खरोखरचं  पैसे झाडावर उगवतात असे गमंतीत वाटले ;) 




पैशाचे झाड





















रस्ता पुढे पुढे थोडा चढणीचा होता पण त्रासदायक अजिबात नव्हता.  शेवटी एका ठिकाणी आम्ही खाली उतरून, लाकडी पूल क्रॉस केला व पलीकडे आलो. थोडा ब्रेक घेऊन मग मुख्य रस्त्याकडे यायला निघालो. थोडेसे चढून आम्ही पुन्हा त्याच रस्त्याला आलो जिथे गाड्या पार्क्ड होत्या. तिथे एक आईसक्रीमची व्हॅन कायम उभी असते. आईसक्रीम घेऊन आम्ही पुन्हा लाँगशॉकडे प्रयाण केले व कार पार्कच्या दिशेने निघालो. एकंदरीत निसर्गाच्या मोहक सान्निध्यात घालवलेला सुंदर दिवस, अगदी मनाची मरगळ झट्कून पुन्हा ताजंतवानं होता आले!!