Saturday, 27 February 2021

उंच टेकडीवरी!!


गेले दोन - तीन दिवस छान ऊन पडतय, घरात बसून कंटाळा आला होता. गेले एक वर्ष फारसे बाहेर फिरायला जाता  आले नाही त्यात पुन्हा सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे रीमोट लर्निंग सुरू आहे मुलांचे. नाही, वेदर जरा बरं असलं की आम्ही बाहेर चालायला पडतोच पण ते आजूबाजूच्या किंवा जवळच्या परीसरातच. मुलांना मुद्दामहून पार्कला आम्ही अजूनतरी नेत नाही, घसरगुंडी, झोपाळे किंवा प्ले एरीया बघून  त्यांना आपण अड्वू शकत नाही, तिथे नेऊन त्यांचा हिरमोड करण्यापेक्षा न गेलेलेच बरे. 

तर आताशी वातावरणातही बदल जाणवू लागलेत, वसंत ऋतूची चाहूल लागलीय, तशी कुठे कुठे चिन्हंही दिसत आहे. मुलांना अनायसे शाळेत स्प्रिंगबद्दल माहिती सांगितली जातेय, कधी गोष्टीच्या माध्यमातून तर कधी चित्र, फोटो, व्हिडिओ दाखवून. मग ठरवलेच की आज लवकर उठून सरळ जवळच असलेले कंट्रीसाईड एक्सप्लोअर करायचे. इथे अनेक डोंगर, टेकड्या आहेत जे लोकं चालत तर कधी सायकल चालवत जातात.असेच घरापासून १५ एक मिनिटांवर सरप्राईझ व्ह्यू  म्हणून टेकडी आहे तिथे आम्ही येऊन पोहोचलो. पायथ्याशीच कार पार्क आहे, गाडी पार्क करून आम्ही चढायला सुरूवात केली. अजूनही डोंगराळ भागात हीथरच्या फुलांचे झुपके दिसले. सर्वत्र हीथरचं रान माजले होते, सर्व झुपके आता वाळून कोळ झालेले. उन्हाळ्यात हीच फुलं सुंदर गुलाबी - जांभाळ्या रंगाची दिसतात, संपूर्ण परीसर अगदी जादूई दिसतो. 
















लोकं इथे कुठूनही चढायला सुरू करत, ठिकठिकाणी छोटी छोटी फाटकं आहेत, त्यातून वर जायला पायवाटा तयार झाल्या आहेत. सरप्राईझ व्ह्यू पीक डिस्ट्रिक्ट मधील हॅदरसेजमधील एक नेत्रदिपक परीसर आहे. चढत असताना आम्हाला संपूर्ण वाट ही वाळू, खडकांची, दगडाळ लागली. वाटेत रेत दिसत होती. चढण फार कठीण, दगदगीचे नाही, तरी थांबत, फोटो काढत आम्ही रमत गमत चाललो होतो. दूरवर डोंगर -दर्‍या दिसत होत्या, उन्हाचे सोनेरी आवरण ल्यायलेल्या, हलक्या धुक्याच्या कुशीत वसलेल्या. खालची हिरवीगार शेतं वरून अगदी स्लाईस केकप्रमाणे दिसत होती. चढणीला कडेला कुंपण असल्यामुळे लहान मुलांना नीट घेऊन जाता येते. मोकळ्या हवेत मोकळेपणे श्वास घ्यायला किती किती बरे वाटत होते. डोक्यातील विचार, मनाची मरगळ, आखुडलेले अंग, सांधा न सांधा मोकळा झाल्यासारखे वाटले, मनाला तरतरी आली. मुलंसुद्धा दुडूदुडू धावत होती, खरंतर त्यांच्यासाठी चढण किंवा चालणे फारच होते पण त्यांनी एकदाही तक्रार न करता मजेने टेकडी सर केली.

या टेकडीवर लोकं सूर्योदय, सूर्यास्त, स्टारगेजींगसाठी येतात. अगदी तांबूस रंगाची उधळण असते. वर पोहोचलो तेव्हा अनेक मोठी खडकं लक्ष वेधून घेत होती. त्यांच्यापर्यंत पोहोचायला हीथरचं जंगल तसेच थोडे भिजलेल्या रेतीमुळे तयार झालेल्या चिखलाचे रस्ते तुडवून जावे लागे. वाट काढत काढत आम्ही त्या मोठाल्या खडकांजवळ आलो आणि मग तिथून वर चढणे फारच सोपे झाले. वरती लोकं होती पण सगळे अंतर राखूनच होते. आम्ही एका खडकावर विसावलो. समोर आम्हाला मदर कॅप स्टोन दिसत होता तर सभोवताली डोंगर, दर्‍या, वारा, लकलकणारा सूर्य. काही वृद्ध जोडपी खडकावर बसून आराम करत होती तर कुठेतरी आमच्यासारखीच लहान मुलांना घेऊन आलेले पालक होते, काही तरूण मुलं मुली आले होते. मुलांनाही आपण अ‍ॅड्व्हेंचरला आल्यासारखे वाटत होते. फोटो काढून, थोड्यावेळ मुक्तपणे तिथेच फिरत होतो. इथे प्राईड अँड प्रेज्युडाईस चित्रपटाचा काही भाग चित्रीत झालाय.

या सरप्राईझ व्ह्यूच्या आजूबाजूला ग्रीट्स्टोन एड्ज, स्टॅनेज एड्ज आहे, तिथे पुन्हा केव्हातरी नक्की जाऊ. डोळे भरून निसर्गाचा आस्वाद घेतल्यावर आम्ही खाली उतरायचे ठरवले. उतरताना आलो त्याच वाटेने खाली जयचे असे ठरवल्यामुळे अगदी अर्ध्या तासात भरभर उतरून आलो. खाली तिथेच सिल्व्हर बर्चची झाडाची गर्दी आहे. निष्पर्ण असूनही संदर दिसत होती. वर निळशार आकाश आणि ही झाडं, मोहक दृश्य होते ते. तिथून लगेच गाडीकडे वळलो आणि आनंदाने घराकडे यायला निघालो.