मिसळपाव.कॉम वर पूर्वप्रकाशित
फार फार वर्षांपूर्वी जापानमधल्या एका खेडेगावात आजी-आजोबा राहत असत. त्यांना मुलं-बाळं नव्हती. ते काहीसे एकाकी असे. आजोबा रोज सरपण गोळा करायला जंगलात जात आणि आजी घरातील कामे आटोपून जवळच्या नदीवर कपडे धुवायला जात असे. उन्हाळ्याचे दिवस असले तरी गाव अगदी सुंदर दिसत होते. नदीकाठाची हिरवळ जणू पाचूचा रंग लेऊन सजली होती. वार्याच्या हलक्या झुळुकीने नदीच्या पाण्यावर तरंग उमटू लागले होते. नदीकाठी असलेल्या छोट्या-छोट्या झाडांचे गोंडे, झुबके वार्यावर डोलत असे. नदीचे पाणी स्वच्छ, पारदर्षक होते. तळाशी असलेले गारगोटे स्पष्ट दिसायचे, नदीतले मासे ही पोहताना सहज दिसे.
एके दिवशी आजी नेहमीप्रमाणे आपली कामे आटोपून नदीवर कपडे धुवायला गेली. एक-एक करून कपडे धुवत असताना अचानक एक प्रचंड मोठं पीच फळ वाहत येताना दिसले. आजीने इतके मोठे पीच याआधी कधीच बघितले नव्हते, तिला वाटले हे पीच किती मोठे आहे, रसाळ दिसत आहे, नक्कीच चवीला स्वादिष्ट असले पाहिजे. आपण काहीही करुन हे पीच आपल्या घरी घेऊन गेले पाहिजे. तिने कसेबसे ते वजनाने जड फळ उचलण्याचा प्रयत्न केला पण तिला काही ते जमले नाही. तिने शेजारीच पडलेल्या काठीने ते पीच स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न केला तरी ते काही ओढ्ता आले नाही. आता काय करावे बरे असा प्रश्न तिला पडला, इतक्यात तिला प्रचलित जापनी मोहिनी मंत्र आठवला. तिने टाळ्या वाजवून मंत्र पुटपुटायला सुरुवात केली,
दुरचे पाणी हे कडू आहे
जवळचे पाणी हे अमृतासारखे गोड आहे
दुरचे पाणी टाळावे
जवळच्या पाण्याकडे यावे....
आजी जसा जसा या मंत्र्याचा जप करत होती तसे तसे ते पीच किनार्याजवळ येऊ लागले. आजीला प्रचंड आनंद झाला तिने ते पीच कसेबसे उचलले आणि लगोलग आपल्या घराकडे निघाली. घरी येऊन ती आता आजोबा यायची वाट बघू लागली. दिवस मावळला तसे आजोबाही डोक्यावर सरपणीचा गठ्ठा घेऊन घराकडे येऊ लागले. आजोबा घरी येताच आजी म्हणाली, "ओ! म्हातारबुआ किती उशीर? मी तुमची केव्हापासून वाट बघत होते." आजोबा चकित होऊन आजीला म्हणाले, "का आज असे काय झाले आहे ? तु इतकी उतावीळ का झालियेस? काही झाले आहे का?""अहो काsहीही झाली नाहीये उलट मी तुमच्यासाठी एक छान्शी भेट घेऊन आलेय", आजी म्हणाली.
आजी लगेचचं आत जाऊन ते पीच घेऊन आली आणि ते मोठाले फळ बघून आजोबा एकदम बावरले, इतके मोठे पीच त्यांनीदेखील याआधी कधीच पाहिले नव्हते. आजोबांनाही पीच बघून अगदी या फळाचा आस्वाद कधी घेतोय असे झाले, इतके रसरशीत दिसत होते ते. आजीने लगचेचं सुरीने ते रसाळ पीच कापायला सुरूवात केली आणि इतक्यात त्यातून एक बाळ टाहो फोडत बाहेर आले. आजी-आजोबा दचकून एक-मेकां कडे पाहू लागले. त्यांचा गोंधळ उडालेला पाहून ते बाळ म्हणू लागले की, "मी कुणी दानव किंवा देव नाही. तुमच्यावर देवाची कृपा झालिये. रोज रात्री तुम्ही दोघे आपल्याला मुल-बाळ नाही म्हणून शोक करत असे. तुमची प्रार्थना, कळकळ समजून घेऊन देवाने मला तुमचा मुलगा म्हणून पाठवले आहे. म्हातारपणात मी तुमचा मोठा आधार बनेन याची खात्री बाळगावी"
आजी-आजोबांना प्रथम काहीच कळेना पण दुसर्याच क्षणी त्यांना अत्यानंद झाला. त्यांच्या आयुष्यात एक गोंडस बाळाचे आगमन झाले होते. त्यांनी त्या बाळाचे नाव मोमोतारो असे ठेवले. जापानी मध्ये मोमो म्हणजे पीच आणि तारोम्हणजे मुलगा. ते त्याला लाडाने, प्रेमाने वाढवू लागले. बरीच वर्ष मधे गेली, मोमोतारो आता पंधरा वर्षांचा झाला होता. तो एक उंचपुरा, बलवान, सुदृढ व दयाळू मुलगा होता. काही काळातचं तो गावातला सर्वात शक्तीशाली मुलगा म्हणून ओळखू जाऊ लागला.
एके दिवशी मोमोतारो आपल्या वडिलांना म्हणाला, "तुम्ही माझे इतके छान संगोपन केले, माझ्यासाठी कष्ट घेतले तुमचे आभार मी कसे मानू?" त्यावर आजोबा म्हणाले, "अरे, ते तर एका वडिलांचे कर्तव्यचं आहे, तुझा सांभाळ केला काराण तू आमचा मुलगा आहेस. तुला असे अभार व्यक्त करायची गरज नाही." मोमोतारो त्यांना म्हणाला "माझी एक इच्छा आहे तुम्ही ती पूर्ण कराल का?" त्यावर आजोबांचे म्हणणे होते नक्कीच पूर्ण करणार पण नेमकी इच्छा आहे तरी काय?
मोमोतारो त्यांना म्हणाला की जापानच्या ईशान्य दिशेला असलेल्या ओनीगाशिमा गावात दानवांनी स्थानिक लोकांना खूप त्रास द्यायला सुरुवात केली आहे. त्यांनी लोकांना घाबवरून सोडले आहे. त्यांची संपती लुबाडली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी गावच्या राजाचा अपमान केला आहे आणि राज्याच्या कायदे-नियमांची अवज्ञा केलीये. हे दानव मनुष्यभक्षक आहेत, त्यांच्यापासून समाजाला धोका निर्माण झाला आहे. मला त्या दानवांना धडा शिकवायचा आहे, त्यांनी लोकांना लुबाडून जी लूट जमा केली ती पुन्हा गावात आणायची आहे म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की मला ओनीगाशिमाला लोकांची मदत करायला जाऊ द्यावे. प्रथम आजी-आजोबांना काय बोलावे कळत नव्हते, इतक्या दूर आपल्या मुलाला कसे पाठवायचे ते ही दानवांशी लढायला....त्यांना मनातून खूप काळजी वाटू लागली पण आजोबांना मोमोतारो हा एक शूर, निर्भय मुलगा आहे हे माहित होते, त्याचा प्रामाणिकपणा आणि आस्थेने केलेला आग्रह त्यांना नाकारता आला नाही शेवटी आजी-आजोबांनी त्याला जाण्यास परवानगी दिली आणि विजयी हो असा आशीर्वाददेखील दिला.
वाटेत खाण्यासाठी आजीने मोमोतारोला त्याच्या आवडीचे ज्वारीचे भरपूर डम्पलिंग्स बनवून दिले. मोमोतारो उत्साहाने निघाला, काही अंतर चालत गेल्यावर मोमोतारोला भूक लागली. तो एका झाडाच्या सावलीत विसावला व आपल्या पिशवीत असलेले डम्पलिंग्ज काढून खाऊ लागला. इतक्यात तिथे एक अंगाने धष्टपुष्ट कुत्रा आला व मोमोतारोवर भुंकू लागला. काहीशा रागाच्या स्वरातचं तो मोमोतारोला म्हणाला, "तू एक उद्दाम मुलगा आहेस, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या शेतातून जायची? तू जर मला तुझ्या पिशवीतले सगळे डम्पलिंग्ज खायला दिलेस तर मी तूला सोडेन नाहितर मी तूला चावून चावून मारून टाकेन."
त्यावर मोमोतारो कुत्सित हसला, तो कुत्र्याला म्हणाला, "तूला माहित आहे मी कोण आहे? मी मोमोतारो आहे आणि मी ओनीगाशिमाला निघालो आहे, तिथे दानवांनी लोकांना त्रास देऊन भंडावून सोडले आही आणि मी त्यांच्याशी युद्ध करायला निघालो आहे. तू जर का माझी वाट अडवलीस तर मी तुझे दोन तुकडे करेन."
मोमोतारोचे नाव ऐकताच कुत्रा एकदम शांत झाला, त्याला त्याच्या उद्धट वागणुकीची लाज वाटू लागली. त्याने मोमोतारोची माफी मागितली, त्याने मोमोतारोच्या शक्तीबद्दल बरेच ऐकले होते. त्याने मोमोतारोला त्याच्यासोबत घेऊन जाण्याची विनंती केली. कुत्र्याची मदन मोमोतारोला शत्रुवर हल्ला करण्यासाठी होणारचं होती म्हणून तो ही त्याला सोबत घेऊन जाण्यास तयार झाला. कुत्रा पार भुकेला होता त्याने मोमोतारोला एक डम्पलिंग खायला देण्यासाठी याचना केली. मोमोतारो त्याला एक डम्पलिंग देत म्हणाला "हे डम्पलिंग जापानमधले सगळ्यात रुचकर डम्पलिंग आहे." डम्पलिंग खाऊन दोघे ओनीगाशिमाच्या दिशेने निघाले.
बरेच डोंगर-दर्या पार करून ते पुढे चालत राहिले. एका ठिकाणी पोहोचताच तिथे असलेलया झाडावरून अचानक एक माकड खाली उतरले व मोमोतारोला म्हणाले मी तुझ्यासोबत येऊ का. माकडाला मोमोतारो दानवांचा खात्मा करण्याच्या मोहिमेवर निघाल्याचे माहित होते. गावो-गावात ही बातमी वार्यासारखी पसरली होती. मोमोतारो काही बोलणार इतक्यात कुत्र्यानेच माकडाला हटकले. तो म्हणाला तूझी गरज नाही आम्ही दोघे हे काम फत्ते करू शकतो. हे ऐकून माकड ही चवताळले व त्याच्याशी भांडू लागले. कुत्रा-माकडाची मारा-मारी बघून मोमोतारो एकदम जोरात ओरडला , "थांबा! तुम्ही जे वागत आहात ते मला अजिबात आवडलेले नाहिये." त्याने कुत्र्याला मागे ढकल्ले व माकडाला विचारले तूला आमच्यासोबत का यायचे आहे? माकड म्हणाले, "तू एक चांगले काम करायला निघाला आहेस आणि या कामात मला तूला मदत करण्याची फार इच्छा आहे." माकडाच्या धाडसाचे कौतूक वाटून मोमोतारो त्याला आपल्यासोबत घेऊन जाण्यास तयार झाला. त्याने माकडाला एक डम्पलिंग खायला दिले.
अख्खा रस्ता माकड-कुत्रा वसवस करत होते. त्यांचे कधीही भांडण सुरू होऊ शकेल हे जाणून मोमोतारोने कुत्र्याला पुढे झेंडा घेऊन चालायला सांगितले व माकडाला मागून तलवार घेऊन. मोमोतारो स्वतः त्या दोघांच्यामध्ये लोखंडी हात-पंखा घेऊन चालू लागला. चालता-चालता ते एका शेताजवळ आले इतक्यात कवडा पक्षी त्यांच्यासमोर उडत येऊन बसला. कवड्याला बघून कुत्रा लगेच त्याचावर हल्ला करण्यासाठी धावून गेला पण कवड्याने लगेच त्याच्या शेपटीवर चोचीने प्रहार केला. दोघांची हाणामारी सुरूच होती पण मोमोतारो कवड्याकडे अगदी कौतुकाने बघत होता, त्याचे साहस बघून तो विस्मयीत झाला. त्याने कुत्र्याला मागे ओढले व कवड्याला मुद्दाम रुष्टपणे म्हणाला, "तू आमच्या मोहिमेत व्यत्य आणत आहेस, मुकाट्याने शरणागती पत्कर नाहीतर मी या कुत्र्याला तुझ्या अंगावर सोडेन आणि तो तुझे चावून लख्तरे काढिल." कवडा घाबरला व गयावया करू लागला, त्याने त्याच्या चुकीची क्षमा मागितली. मोमोतारोने त्याला त्यांच्यासोबत यायला सांगितले, कवड्याने लगेचचं सोबत जाण्याची तयारी दर्शावली.
मोमोतारोने मग सगळ्यांना एकत्र करून महत्वाची गोष्ट सांगितली, आपण एका महत्वाच्या मोहिमेवर निघालो आहोत, आपल्यात संवाद, एकोपा हा असलाच पाहिजे . जर आपण एकत्र मिळून काम केले तरचं यश मिळेल नाहितर आपले शत्रु आपल्यावर विजय मिळवतील. यापुढे तुम्ही तोघे मित्र असाल, जे कराल ते एकत्र करायचे, ज्याक्षणी तुमच्या वाद व्ह्यायला सुरूवात होईल त्याक्षणी मी तुम्हाला या मोहिमेतून बरखास्त करेन. तीनही प्राणीमित्रांनी मोमोतारोला तसे वचन दिले.
मोमोतारो व टोळी अनेक दिवस प्रवास करून समुद्राकिनारी पोहोचली. एका छोट्या नवेत बसून सर्व मंडळी ओनीगाशिमेच्या दिशेने निघाले. दूर-दूर फक्त क्षितिज दिसत होते. दिवसांमागून दिवस जात होते आणि या टोळीचा जलप्रवास सुरूच होता. जेव्हा हे सगळे ओनीगाशिमाला पोहोचले तेव्हा त्यांना भला मोठा किल्ला दिसला ज्याचे लोखंडी फाटक बंद होते. मोमोतारोने कवड्याला सांगितले की तुझ्या पंखात बळ असेल तर तू किल्ल्याच्या आत उडत जा. आता जाताच दानवांची दिशाभूल कर आम्ही तेव्हढ्यात किल्ल्यात कसा प्रवेश करता येईल ते बघतो. कवडा पक्षी मोमोतारोची आज्ञा मानून लगेच उडून गेला. आत शिरताच त्याने दानवांना मोठ-मोठ्याने ओरडून सांगितले की, "ऐका हो दानवांनो!! तुमचा खात्मा करायला जापानमधला सर्वात शक्तीशाली, बलवान मुलगा आलाय. तो येण्याआधी तुम्ही बर्याबोलाने ओनीगाशिमा सोडून निघून जा. तुम्ही जर शरणागती पत्कारली असल्यास आपल्या कपाळ्यावरची शिंगे तोडून सहमती दाखवावी आणि जर का तसे केले नाही तर आम्ही म्हणजे मी, कुत्रा, माकड तुम्हाला चावून, टोचून, ओरबाडून मारून टाकु."
कवड्याच्या बोलण्याकडे दानवांनी लक्ष दिले नाही उलट ते युद्धासाठी जोमाने तयारी करु लागले. हे प्राणी आपल्याला काय मारतील असा काहीसा त्यांचा अविर्भाव होता. इथे मोमोतारो किल्ल्याच्या जवळपास पोहोचला होता. तिथे त्याला दोन बालिका कपडे धुताना दिसल्या त्यानी त्यांना किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी कुठला चोररस्ता आहे का असे विचारले. त्या बालिका म्हणजे राजाच्या मुली होत्या ज्यांना दानवांनी पकडून या किल्ल्यात आणले आणि दासी म्हणुन ठेवले. मोमोतारोला बघताच त्या रडू लागल्या व त्यांनी त्यांची परीस्थिती मोमोतारोला सांगितली, त्या मदत मागू लागल्या. मोमोतारोने त्यांना आशवासन दिले की तो त्यांची या किल्ल्यातून नक्की सुटका करेल पण त्याधी त्यांनी त्याला किल्ल्यात प्रवेश करण्यसाठी मदत करावी. दासींनी त्याला एक चोररस्ता दाखवला व मोमोतारो आपल्या टोळीसह तिथून आत प्रवशे करण्यासाठी निघाला.
आत जाताच मोमोतारो दानवांना जरा दरडावून म्हणाला, "आम्ही तुम्हला शिक्षा करायला आलो आहोत. तुम्ही उच्छाद मांडून आमच्या देशबांधवांना त्रास दिलाय, दहशत पसरवून घाबरवून सोडले आहे." असे म्हणताच कवड्या दानवांना चोच मारू लागला. माकडाने त्यांच्यावर झडप घालून ओरखडणे सुरू केले व कुत्र्यांने त्यांचे पाय, दंडावर चावायला सुरूवात केली. मोमोतारो त्यांच्याशी तलवार, लोखंडी हात- पंख्याने वार करू लागला. त्यांना शंभर हत्तींचे बळ आले होते आणि त्यांनी शत्रुवर जोमाने हल्ला चढवला होता. काही दानव तर किल्ल्याच्या कठड्यावरून खाली पडून मेले तर काही समुद्रात पडून बुडाले. मोमोतारो आणि टोळींनी दानवांना पूर्णपणे सळो की पळो करून सोडले. दानवांच्या म्होरक्याने मोमोतारअसमोर शेवटी गुढघे टेकले व तो गयावया करू लागला. अगदी रडकुंडीला आलेला म्होरक्या मोमोतारोला म्हणला, "मी तूला वचन देतो आम्ही यापुढे मनुष्यजातीला कुठल्याच प्रकारच त्रास होऊ देणार नाही आणि जी संपती आम्ही तुम्हा मनुष्यांकडून लुबाडली आहे ती आम्ही परत करू." अगदी आर्जवी स्वरात तो म्हणाला, "आम्हाला जाऊ द्या, आमचे प्राण वाचवा." पण मोमोतारोने त्याला पकडून, बांधून माकडाच्या हवाली केले. त्यानंतर तो किल्ल्यातील प्रत्येक खोलीत जाऊन जी लोकं कैद होते त्यांना सोडवू लागला. जो काही ऐवज दानवांनी लोकांकडून लुबाडला होता तो जमा केला. त्यांनी राजाच्या मुलींना ही सुरक्षितपणे आपल्या घरी सोडले. त्याने सगळी संपत्ती छोट्या नावेत चढवली व तो त्याच्या लहान पण अधिक शक्तीशाली टोळीसकट आपल्या गावाकडे विजयी होऊन परतण्यासाठी निघाला. दानवांच्या म्होरक्याला त्याने आपल्यासोबत बंदीवान करून आणले. त्याच्या कर्तुत्वाचे, धाडसाचे आजी-आजोबांना, संपूर्ण गावाला कौतुक वाटले. मोमोतारोने दानवांपासून सगळ्यांना वाचवले होते आणि त्याच्या या साहसामुळे सगळ्यांचा आनंद द्विगुणीत झाला.
खरचं मोमोतारोने आपल्या सामर्थ्याचा, शक्तीचा सदुपयोग केला होता. गावकर्यांचे आशीर्वाद त्याला लाभले होते. आजी-आजोबांना एकदम कृतकृत्य झाल्यासारखे वाटले.
(जापानी बालकथेचा स्वैर अनुवाद करण्याचा पहिलाच प्रयत्न केलाय :) )