Monday, 16 June 2014

अविस्मरणीय ग्रीस !!

 फेब- मार्च मध्ये नेदरलॅड्स ट्रिपबद्दल मैत्रीणीशी बोलत असताना ग्रीसला कधीतरी जायची इच्छा आहे असे म्हटले होते तेव्हा समजले की मैत्रीणीला ही तिथे जायचे आहे मग काय आम्ही लगेच ग्रीसबद्द्ल माहिती गोळा करु लागलो. किती दिवसांसाठी जाता येईल, काय-काय बघता येईल, सुट्ट्या कधी घ्याव्या लागतील आणि मुख्य म्हणजे तिथे जाण्यासाठी कुठला सीझन बरा असेल वगैरे वगैरे.

मैत्रीणीने तिच्या ग्रीक सहकर्मचारार्‍याला बरीच माहिती विचारली, त्याच्या म्हणण्यानुसार मे-जून किंवा सप्टेंबर महिन्यात ग्रीसला जाणे बरे, जुलै-ऑगस्ट्मध्ये वातावरण अधिक उष्णं असतं, उन्हाचा त्रास होऊ शकतो शिवाय समुद्राची वाळू इतकी तापलेली असते की पाय भाजतात.

मी ही मिपाकर निशांतला व्यनि टाकून माहिती विचारली. त्याने खूप छान माहिती दिली. त्याची आठवणीतले ग्रीस ही लेखमाला वाचून काढली. त्याप्रमाणी शोधा-शोध करुन बेसीक itinerary तयार केली. एप्रिल महिन्यात आम्ही नेदरलँड्सला जाणारचं होतो तेव्हा तिथे आलो की पुढचे बोलूच असे ठरले.

तिथे गेलो तेव्हा समजले की कदाचित ही ट्रिप लांबणीवर पडण्याची शक्यता आहे कारण मैत्रीणीने नुकतेच पासपोर्टवर नाव बदलण्यासाठी अर्ज केला होता आणि नवा पासपोर्ट आल्यावर तिला तिच्या रेसिडेंस पर्मिटवर ही नाव बदलून घ्यायाला लागणार होते. ह्या सर्व प्रोसिजरला निदान दोन महिने तरी लागणार असे तिचे म्हणणे पडले. मग काय आम्ही हताश होऊन ग्रीसचा विचार तात्पूर्ती बाजुला ठेवला :( , म्हटले बघुया जूनच्या आधी आले तर ठिक नाहीतर सप्टेंबरला जाऊन येऊ.

मेच्या साधारण पहिल्या आठवड्यात मैत्रीणीचा व्यनि आला की तिचे पासपोर्टचे काम झाले होते आणि पर्मिटसाठी तिने अर्ज केला होता आणि ते यायला फार दिवस लागत नाही तर आपण पुन्हा ग्रीस ट्रिपबद्दल ठरवायला घेऊया, निदान तारखा ठरवायला घेऊया व त्याप्रमाणे हॉटेल्स बघायला सुरु करुयात. आता मुख्य प्रश्न होता तो सुट्ट्यांचा, नवर्‍याचे आणि मित्र-मैत्रीणीचे रूटीन वेगळे होते. त्याच्या शिफ्ट्स असल्यामुळे अशा एकत्र सुट्ट्या मिळणं जरा कठिणचं होते.

जुनच्या पहिल्या आठवड्यात जायचे त्याप्रमाणे प्रत्येकाने आप-आपल्या ऑफिसात सुट्ट्यांसाठी अर्ज केला. जून म्हणून नशीबाने त्या मिळाल्या ही :) . अनेक स्काईप चॅटिंग झाले, चर्चा झाल्या व शेवटी बुकिंग.कॉमवरून आम्ही हॉटेल्स बुक करुन ठेवली. आता विमानाची तिकिटं बघायची होती , आम्ही दोन वेगळ्या देशातून जाणार होतो त्याप्रमाणे एकाच दिवशी ग्रीसला पोहोचलो तर बरं होईल असे वाटत होते. ट्रिपला इतके कमी दिवस असताना तिकिटं बघत असल्यामुळे तिकिटं कैच्याकै महाग होती. त्यात आम्हाला लंडनवरून थेट विमान पकडायचे तर त्यासाठी किमान ३-४ तास आधी प्रवास करावा लागणार होता. मँचेस्टरवरुन थेट विमान होतं तर त्याचे आणी आमचे वेळापत्रक जुळत नव्हते. शेवटी बर्मिंगह्म विमानतळावरुन फ्रँकफुर्टमार्गे अथेन्ससाठी आम्हाला बुकिंग मिळाले. हॉल्ट ही फार वेळ नव्हता त्यामुळे लगेच तिकिटं बुक केली. मैत्रीणीला थेट विमान मिळाले व ते आमच्या काही तासचं आधी अथेन्सला पोहोचणार होते.

निशांत ने सांगितल्याप्रमाणे आम्ही अथेन्स- नॅक्सोस- सँटोरेनी - अथेन्स अशी फेरीची तिकिटं ही ब्ल्यू स्टार फेरीजच्या वेबसाईटवरून आधीच बुक करुन ठेवली. आता वाट बघायची होती ती सात जूनची.

हळू हळू तयारी, नकाशे, प्रिंट- ऑऊट्स, शॉपिंग, पॅकिंग सुरु झाले. ठेपले, घारगे, लाडू असा खाऊ पण सोबत घेतला होता ;) ७ तारखेच्या सकाळी आम्ही बर्मिंगह्मसाठी रवाना झालो. आमचे विमान दुपारचे होते.

.

विमानतळावरून गेटला जाण्यासाठी एअरलिंक रेल (मोनोरेल)घेतली.

.

छायाचित्र आंजावरुन साभार.

बॅगा ड्रॉप करून सिक्युरीटीचे सोपस्कार पार पाडून आम्ही विमानाची वाट बघु लागलो. पाऊस ही नुकताच पडून गेलेला आणि अशा वातावरणातून कधी बाहेर पडु असे वाटत होते. थोड्या वेळात विमान लागले आणि आता ग्रीसला जाण्याची उत्कंठा वाढू लागली.

.

आम्ही बोर्डिंग सुरु केले आणि दीड तासात आम्ही फ्रँकफुर्टला पोहोचलो. तिथे ही सिक्युरीटी चेक-इन करुन आम्ही थोड्यावेळ ड्युटी फ्री मध्ये टाईमपास केला. प्रवासाचा एक टप्पा पार पडला होता आता फ्रँकफुर्ट - अथेन्सचे विमान पकडायचे होते. थोड्या वेळात एजीयन एअरलाईन्सचे विमान बोर्ड करायला सुरुवात केली आणि फ्रँकफुर्टला टाटा करत आम्ही अथेन्सला निघालो.

.

काही तासात अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर Eleftherios Venizelos आमचे आगमन झाले. तिथल्या वेळेप्रमाणे आम्ही रात्री साडे नऊला पोहोचलो होतो. सामान घेऊन आम्हाला लगेच विमानतळावरून हॉटेलला जायला मेट्रो पकडायची होती पण बॅगा उशीरा आल्या असल्यामुळे आमची रात्री दहाची मेट्रो चुकली आणि आता पुढची मेट्रो साडे-दहाला होती. विमानतळाच्या बाहेर येताच अथेन्स सिटी सेंटरला म्हणजेच सिंतागामा स्क्वेअरला जाणारी X९५ बस उभीच होती, पटकन दोन तिकिटं काढली आणि बसमध्ये चढलो. बस ४०-५० मिनिटांत सिंतागामा स्क्वेअरला पोहोचली. तिथून आमचे हॉटेल दहा मिनिटाच्या अतंरावर होते. हॉटेलला पोहोचलो तेव्हा मित्र-मैत्रीण आधीच आले होते व आमची वाट बघत होते. त्यांनी आमच्या रुमची चावी आधीच घेऊन ठेवली होती, पटापट रुममध्ये गेलो, सामान टाकले व दुसर्‍या दिवशी काय काय करायचे ह्यावर थोडी चर्चा केली. मस्तं फ्रेश झालो आणी ए-सी लावून गुडुप झालो. वातावराणाचा बदल जाणवत होता.

उद्या लवकर उठून अ‍ॅक्रोपोलिसला (बोली भाषेत अ‍ॅक्रोपोली) जायचे होते :)

No comments:

Post a Comment