मे महिन्याच्या पहिल्या लाँग विकांताला मित्र-परिवारासोबत चार दिवस कॅरावॅन हॉलिडे करुन आले. शेफिल्डपासून अडिच तासाच्या अंतरावर फिली म्हणून कॅरावॅन पार्क आहे तिथे असंख्य स्टॅटिक कॅरावॅन्स, टेंट्स, मोटरहोम्स पार्क करण्याची सुविधा आहे. तर चार दिवसाच्या मुक्कामात जवळपास काय प्रेक्षणीय स्थळे आहेत हे बघायचे ठरवले, जणेकरुन बाहेर फिरणं ही होईल आणि वॅनमध्ये वेळही घालवता येईल. फिलीपासून १०-१५ मिनिटाच्या अंतरावर स्कारबराह बीच आहे त्याचे नॉर्थ बे आणि साऊथ बे असे दोन बीचेस आहेत. तो आमचा आवडता बीच, अनेक वेळा तिथे गेलोय पण नवीन अजून काय बघायचे असे चालले होते. मग फिलीपासून साधारण ३० मिनिटाच्या अंतरावर फ्लॅमबराह नावाची जागा आहे जिथे लाईटहाऊस आणि फ्लॅमबराह हेड बघण्यासारखे आहे. आम्ही तिथे ह्या आधी ही गेलो होतो आणि ह्यावेळेसही जाणार होतोच कारण मैत्रीणीला तिच्या मुलांना लाईटहाऊस टुर करावयाची होती . मग असे ठरले की शुक्रवारी फिली पार्कमध्ये वेळ घालवायचा, शनीवारी व्हिटबी आणि स्कारबराह बीचवर टाईमपास, रविवारी आराम + मस्तं क्रिकेट, उनो खेळायचे, स्वीमींग करायचे आणि सोमवारी फ्लॅमबराह करुन घरी निघायचे.
ठरल्याप्रमाणे दुसर्या दिवशी सकाळी आंघोळी, ब्रेकफास्ट आटोपून आम्ही व्हिटबीच्या दिशेने निघालो. साधारण ४० मिनिटाचा ड्राईव्ह होता . छान वळण- घाटच्या रस्त्यावरुन आम्ही निघालो. काही मिनिटातचं आम्हाला दुरून व्हिटबी अॅबी दिसू लागले.
दहा एक मिनिटात आम्ही अॅबीच्या कार-पार्कपाशी पोहोचलो. खरं तर नंतर लक्षात आले की अम्हाला अॅबीला जाण्यासाठी सुप्रसिद्ध १९९ स्टेप्सपाशी पोहोचायचे होते आणि तिथून मग आम्ही चढाई करून जाणार होतो , पण आमच्या नॅव्हिगेटरने पोस्ट-कोड टेकडी जवळपासचा सिलेक्ट केल्यामुळे आम्ही थेट टेकडीवरचं पोहोचलो. असो, तर गाड्या पार्क करुन आम्ही पुढे निघालो. ईस्ट क्लिफवरुन दिसणारे व्हिटबी शहराचे मोहक दृश्य अगदी सुरेख होते, उजव्या हाताला दिसणरं अॅबी ही खुणावत होतं. काही फोटो काढून आम्ही पुढे निघलो.
टेकडीवरून दिसणारे व्हिटबी.
६८० मध्ये साध्वी हिल्डाच्या मृत्युनंतर पुढच्या २०० वर्षानंतर म्हणजे ८६७-८७० दरम्यान वायकिंग्स हल्ल्यामुळे अॅबीची नासधूस होऊन ते ओसाड पडले, भकास वाटु लागले . १०६६ साली काही पाद्रींनी ज्यांना Prestebi म्ह्णून ओळखले जाई त्यांनी अॅबीचा अगदी लहान प्रमाणात जीर्णोद्धार केला.
माजी सैनिक, रेनफ्रिड जो संन्यासी झाला होता त्याने ह्या अॅबीचे पुनःनिर्माण करायचे ठरवले. १५४० च्या काळात हेनरी दि एट्थ, ज्याचे अॅन बोएलेनशी लग्न झाले होते, तो चर्च ऑफ इंग्लंडचा मुख्य होता आणि त्यानी सगळी मठं बंद केली त्यात व्हिटबी अॅबीही होते. १४-१५ व्या शतकात ह्या चर्चची पुनर्बांधणी केली गेली. एक भव्य दिव्य रस्ता होता त्याला स्वतंत्र आखाती बांधल्या गेल्या. सात चॅपल्स बाधंले गेले, प्रत्येकी एक अल्टार होते. डिसेंबर १९१४ मध्ये अॅबीवर जर्मन युद्धनौकेच्या हल्ल्यमुळे खूप नुकसान झाले.
काही थडगी अॅबीच्या आवारात असलेली.
व्हिटबी अॅबी अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ती म्हणजे ड्रॅक्युला.
होय, ड्रॅक्युला ह्या पुस्तकाचे लेखक ब्रॅम स्टोकर आयरलँंडवरून इंग्लंड-व्हिटबीला सुट्टीसाठी आले तेव्हा त्यांनी ह्या अॅबीनं प्रभावित होऊन ड्रॅक्युला लिहिलं. अॅबीकडे जाणार्या १९९ पायर्या आहेत, पुस्तकात लिहिल्याप्रमाणे जेव्हा ड्रॅक्युलाची बोट किनार्याला येऊन आदळते तेव्हा त्यातून काळा कुत्रा बाहेर येऊन पळत सुटतो आणि थेट १९९ पायर्या चढून वर जातो, त्याच ह्या पायर्या.
१९९ स्टेप्स - छायाचित्र आंजावरुन साभार

व्हिटबी अॅबीला गॉथीक अॅबी म्हणूनही ओळखले जाते आणि व्हिटबीला गॉथ कॅपिटल ऑफ ब्रिटन. जवळपास सेंट मेरी कबरस्थान / स्मशानभूमी आहे जिथे ड्रॅक्युलाने आपल्या पहिल्या व्हिक्टमचा चावा घेऊन रक्त शोषले होते असे म्हणतात.
एकंदरीत हा अनुभव खूपचं उत्कंठापूर्ण होता, अॅबीबद्दल बरीच माहिती मिळाली होती. आमचे १९९ स्टेप्स चढायचे राहून गेले बट देअर इज ऑल्वेज नेक्स्ट टाईम :)
अॅबीतून बाहेर येऊन तिकडची आठवण म्हणून काहीतरी वस्तू घेऊया ठरवले, अनेक ड्रॅक्युलाचे चित्र असलेले मग्ज, स्कार्फ, ब्लड टॉनिक कॉर्डीयल, की चेन्स, पुस्तकं होती. काही वर्षांपूर्वी ड्रॅक्युला पुस्तकचे पीडिएफ वाचले होते मग लगेच सोव्हेनियर म्हणून आणि संग्रहित राहिल म्हणून पुस्तकचं विकत घेतले :)

वातावरण ही गार होतं आणि सगळ्यांना भुका ही लागल्या होत्या म्हणून आवारातचं असलेल्या टी-रुम मधे मस्तं व्हेज पनीनी, व्हेज लजानियावर झक्कास ताव मारला :)
व्हेज पनीनी

व्हेज लजानिया

भरपूर फोटो, एक मस्तं दिवस, छान आठवणी घेऊन अॅबीला टाटा करुन आमची गाडी स्कारबराह बीचच्या दिशेने निघाली. एक अविस्मर्णिय, विलक्षण अनुभव देणारा दिवस गेला होता.

No comments:
Post a Comment