ईस्टरचा लाँग वीकेंड - अनायसे वेदर खूप छान होतं. दिवसही मोठा असल्यामुळे आम्ही आज मुलांना घेऊन पिकनीकला जायचे ठरवले. मुख्य हेतू वॉकिंग आणि निसर्गाचा आनंद उपभोगणे हाच असल्यामुळे आम्ही त्याच तयारीनिशी निघालो. फळं, सँडविचेस, पाणी आणि सिरीअल बार्स त्याच बरोबर फर्स्ट एड कीट बॅगपॅकमध्ये पॅक केले आणि वॉकिंग शूज घालून आमची पलटण निघाली..... पॅडले गॉर्जला.
पॅडले गॉर्ज हे पीक डिस्ट्रीक्टमधले एक नयनरम्य ठिकाण आहे. घरापासून मोजून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेले. हा वृक्षमय परीसर बर्बेज ब्रुक ओढ्याने घेरलेला आहे. हे ठिकाण लाँगशॉ ईस्टेट्पासून अर्ध्या माईलवर तर ग्रींडलफोर्ड गाव, रेल्वे स्टेशन आणि A6187 रस्त्यामध्ये वसलेले आहे. तुम्ही ग्रींडलफोर्डला गाडी पार्क करून अप्पर पॅडलेवरूनही जाऊ शकता. आम्ही लाँगशॉच्या कार पार्कला गाडी पार्क करून तिथून पिंक रूट फॉलो करायला सुरू केले. खरतर वर्तूळाकार रूट आहे आणि फारसा वेळ लागत नाही, पण आम्ही एकूण साडेतीन तासात संपूर्ण रूट पूर्ण केला कारण वाटेत असंख्य फोटो स्टॉप्स आहेत आणि सभोवतालचे सृष्टी सौंदर्य पाहून खरोखरचं भारावून जायला होतं. मुलांना ही फार फार मज्जा आली, एकदम अॅडव्हेंचरस वाटले त्यांना.
लाँगशॉचा बोगॉर्ट ट्रेल रूट फारच सुंदर आहे. दाट झाडी, तळे, तळ्यात विहार करणारी बदकं, डोळ्यांना निववणारी हिरवळ, दूरवर शेतात चरणारी मेंढरं, पक्ष्यांचा किलबिलाट, मोठ-मोठ्या ओकच्या झाडांचे बाकडेवजा ओंडके, ओंडक्यांना फेअरी हाऊससदृश्य कोरले गेलेय. तिथून पुढे चालत आले की लाँगशॉ लॉज दिसतं. हे १८२७ च्या काळात ड्युक ऑफ रटलँड यांनी बांधले. या वास्तूचा एक वेगळाच इतिहास आहे. ही वास्तू पहिल्या महायुद्धाच्या वेळी अनेक जखमी सैनिकांचे आश्रयस्थान ठरली होती.
पुढे १/२ माईलचा रस्ता चालत आल्यावर आम्हाला लाकडी गेट लागले जे मुख्य रस्त्याकडे घेऊन जात होते, तिथेच एक ओपन बार्न आहे. आत बरीच वेगवेगळी माहिती असलेले बोर्ड्स आहेत. तिथेच एक मॅप सुद्धा आहे व बसण्यासाठी दोन बाकडी आहेत. पुढे आल्यावर गाड्याची रांग दिसते, हे रोडसाईड फ्री पार्किंग आहे पण इथे गाडी अगदी नीट पार्क करावी, इथले पोलिस फार कडक आहेत व लगेच फाईन लावण्यासाठी त्यांची पॅट्रोलिंग कार फिरत असते. रस्ता क्रॉसकरून आम्ही गेटमधून खाली उतरलो आणि आम्हाला तिथे बर्बेज ब्रुक ओढा दिसला. लोकं त्यात पाय सोडून बसलेले होते तर कुणी पाण्यात उतरले होते. बरीच लोकं किनार्यावर पिकनीक मांडून बसली होती. जवळचं असलेल्या लाकडी पूलावरून आम्ही पलीकडे गेलो व चालायला सुरुवात केली.
एका बाजूला ओढा वाहतोय आणि एका बाजूला मोठ-मोठ्या पाषाणांनी सजलेला परीसर. पाषाणांवर शेवाळे होते त्यामुळे पिवळसर, हिरवट, करड्या रंगाचे खडकं त्या वनंस्थळी उठून दिसत होती. त्यावर चढून उड्या मारायला मजा आली. जस-जसे पुढे आलो तसे उजव्या बाजूला ओक आणि बर्चची मोठाली, वळणदार, जराशी आक्राळ - विक्राळ वृक्ष लक्ष वेधून घेत होती. मुलांना त्या झाडांवर चढायला भारी मजा वाटली. अगदी घनदाट जंगलाप्रमाणे परीसर होता, सूर्याची किरणंसुद्धा फांद्यांशी लंपडाव खेळत खाली पोचत होती. निरव शांतेत पक्ष्यांचे कूजन स्पष्ट ऐकू येत होतं. डाव्या बाजूला वाहणार्या ओढ्याचे खळखळणे अगदी जीवाला शांत करणारे, संतुष्ट करणारे होते. पुढील वाट ही जरी खडकाळ असली तरी कठिण नव्हती. एका ठिकाणी येताच आम्हाला एक झाड दिसले ज्यावर अनेक पेन्स (कॉईन्स) ठोकलेले दिसले, ते पाहून खरोखरचं पैसे झाडावर उगवतात असे गमंतीत वाटले ;)
रस्ता पुढे पुढे थोडा चढणीचा होता पण त्रासदायक अजिबात नव्हता. शेवटी एका ठिकाणी आम्ही खाली उतरून, लाकडी पूल क्रॉस केला व पलीकडे आलो. थोडा ब्रेक घेऊन मग मुख्य रस्त्याकडे यायला निघालो. थोडेसे चढून आम्ही पुन्हा त्याच रस्त्याला आलो जिथे गाड्या पार्क्ड होत्या. तिथे एक आईसक्रीमची व्हॅन कायम उभी असते. आईसक्रीम घेऊन आम्ही पुन्हा लाँगशॉकडे प्रयाण केले व कार पार्कच्या दिशेने निघालो. एकंदरीत निसर्गाच्या मोहक सान्निध्यात घालवलेला सुंदर दिवस, अगदी मनाची मरगळ झट्कून पुन्हा ताजंतवानं होता आले!!































No comments:
Post a Comment