Tuesday, 17 February 2009

साथ

आज सकाळपासूनच मधुराची खूप धावपळ होत होती. कसेबसे घरचे सगळे काम आटोपून ती ऑफीसला निघाली . आज तिची पटवर्धन फुड कंपनी बरोबर मीटिंग होती , काही कॉन्ट्रक्ट्स मिळण्याचे प्रयत्न सुरू होते. मधुरा तशी खूपच साधी, सरळ, अत्यन्त हुशार, शिस्तबद्ध आणि महत्वकांशी होती. एम बी ए करून ती सामंत ब्रदर्स मध्ये मार्केटिंग मॅनेजरच्या पदावर काम करत होती. अतिशय मेहनती आणि कर्तबगार अशी ही मधुरा लगबगीने ऑफीसला पोहोचली तीच ऑफीसच्या मुख्य दरवाज़ात तिला एक चेहरा ओळखीचा दिसला. खात्री करण्यासाठी ती पुढे सरसावली पण तितक्यात तिला सौ. बेंद्रे भेटल्या आणि मग बोलता बोलता ती त्यांच्यासोबत आपल्या कॅबिनमध्ये गेली. तिची खूपच घाई सुरू होती पटापट सगळ्या प्रॉजेक्ट डीटेल्स तिने घेतले आणि ती कान्फरेन्स रूम मध्ये गेली , तिकडे पटवर्धन फुड कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर आणि काही क्लाइंट बसले होते. मीटिंगला सुरूवात झाली आणि काही मसाल्यांचे सॅंपल्स घेऊन पटवर्धन कंपनीचा एक सॅलेस एजेंट पुढे आला . त्याने ती सर्व सॅंपल्स मधुराला दिली, ते घेण्यासाठी मधुराने वर बघितले तर...तो चेहरा.... तो बघताच मधुरच्या पायाखालची जमीन सरकली, हाच तो चेहरा जो मघाशी आपण बघितला होता, एका क्षणात सर्व आठवणी ताज्या झाल्या, सर्व ज़खमा ओल्या झाल्या. तिला दरदरुन घाम फुटला काय करावे काहीच सुचत नव्हते डोळ्यासमोर अंधार येत होता. कसेतरि तिने ती मीटिंग आटोपती घेतली आणि ती आपल्या कॅबिनमध्ये निघून गेली.संपूर्ण दिवस ऑफीसच्या कामात तिचा लक्ष लागलच नाही. अक्खा दिवस बेचैनी जाणवत होती. घरी आली तेव्हा ती थकली होती डोक्यात असंख्य विचार होते, प्रश्न होते पण मन मोकळ करायला कोणीच नव्हत. घरी आली तेच अनघा धावत आली आणि म्हणाली, " आई तू चहा घेणार ना?? मी बनवतेय..." मधुरा ने फक्त ह्म्म केल आणि फ्रेश होण्याकरता गेली. चहा पिऊन जरा तरतरी आली पण विचारांच काहूर माजलं होत. इकडे अनघा तिच्या कॉलेजमध्ये घडलेल्या घटना सांगत होती पण कशातच मधुराच लक्ष नव्हत.. बस्स सारखा हाच विचार की तो आज आपल्याला वीस वर्षानंतर दिसला ते ही अश्या अवस्थेत काहीच समजत नव्हत.

*************************************************************************************

मानस आणि मधुरा दोघे ही एकाच कंपनीमध्ये कामाला होते, अगदी हसत खेळत काम करायचे, त्यातुन मैत्री झाली, आणि मग मैत्रीचे रुपांतर प्रेमात आणि नंतर विवाहात. दोघे ही अगदी करिअरीस्ट, आणि तेवढेच ताठ. लग्न झाल्यावर ही काही फारसे बिनसत नव्हते, लग्नानंतर थोड्या दिवसानी दोघानीही कंपनी बदलली, आणि चा॑गल्या पगाराच्या चा॑गल्या हुद्दुयाच्या नोक-या पत्करल्या. त्यातच मधुराला दिवस गेले होते, घरातील वातावरण अगदी आनंदी होतं. अचानक एके दिवशी मानसच्या कंपनीमध्ये एक मोठा फ्रॉड झाला आणि त्याच बालन्ट सगळ मानसवर आल. अवघडलेली मधुराची परिस्थिती आणि मानसच मानसिक टेन्षन मुळे घरात ताण वाढतच गेला. बिच्चारी मधुरा पाच महिन्याचा गर्भा घेऊन मानसची केस कोणीतरी लढावी म्हणून अथक प्रयत्न करत होती, आणि इकडे मानस दारूच्या आहारी गेला होता. सकाळ-संध्याकाळ त्या दोघांमध्ये वाद होत आणि मधुराची बढती, तिचा वाढता पगार, तिच्या पगारामुळे चालणारे घर हे सर्व मानसला खटकू लागले, त्यामुळे तो अधिकच दारू पीऊ लागला. असेच एके दिवशी दोघांमध्ये वाद झाला आणि मानस पुढचा मागचा विचार न करता घर सोडून, मधुराला सोडून निघून गेला. अनघाचा जन्म झाल्यानंतर मधुराने मुंबई सोडून पुण्याला राहण्याचा निर्णय घेतला. तिने खूप शोधले ही मानसला पण तिला यश आले नाही. ज्या माणसाने आपल्या पत्नीची, होणार्‍या बाळाची जवाबदारी नाकारली अश्या माणसाची तिला अधिक चीड येऊ लागली आणि तिने ठरवले की अनघा आणि ती हेच तिच विश्व आता आणि त्यात दुसरा तिसरा कोणीच असा नाही. खूप काबाड-कष्ट करून, रात्रंदिवस एक करून मधुराने अनघासाठी खूप केले तिला कधीच वडिलांची उणीव भासु दिली नाही. अनघा जवळ असल्यामुळे तीला फारसा एकटापणा जाणवायचा नाही, कधी कधी मानसची आठवण यायची पण ती त्याचे विचार मनातुन पुसुन टाकायची. आज वीस वर्षानंतर मानस अचानक तिला ऑफीस मध्ये दिसला आणि तिला सर्व आठवू लागलं. मानस सारखा हुशार माणूस दारूच्या आहारी गेल्यावर माणसाचं आयुष्य कस मातिमोल होत हे तिला दिसल. कोणे एके काळी मॅनेजर म्हणून रुबाबात असणारा मानस आज एक सॅलेस एजेंट म्हणून काम करत आहे. इतकी दैनिय परिस्थिती कशी होऊ शकते कोणाची , पण म्हणतात ना केलेल्या कर्माची मुक्ताफळं.



**************************************************************************************



मधुरा आज सकाळी ऑफीसला आली तेव्हा मानस समोरच उभा होता. ती येताच त्याने तिची माफी मागण्याचा प्रयत्न केला , खूप विनवण्या केल्या पण मधुराला काही एक ऐकून घ्याचं नव्हत . घर सोडून गेल्यावर मानस मुंबई सोडून दिल्लीला गेला आणि तिकडे त्याच्या आयुष्याची खरी वाताहत झाली. दारोदारी नोकरीसाठी खूप पायपीट केली पण अपयशच हाती आल. वाढतं दारूच व्यसन त्याला काम करू देईना आणि जगण्यासाठी हात-पाय मारण त्याला स्वस्थ बसू देईना. मिळेल ती कामं करून तो पोट भरत होता, अगदी रस्त्यावर आला होता. पाच- सहा वर्षानी तो मुंबईत परतला पण इथे ही कोणी नातेवाईकाने त्याला उभ केल नाही. एका हॉटेलमध्ये वेटरचा काम करून दिवस काढत होता. काम कुठलही असो त्यात प्रामाणिकपणा होताच. कोण्या एका शेठने पुण्यात माझ्या हॉटेलमध्ये काम करतोस का म्हणून विचारले आणि त्याची रवानगी पुण्याला झाली तेव्हा पासून तो ही पुण्यातच राहत होता. हळू हळू त्याचे काम पाहून त्याच्या शेठने त्याला पटवर्धन फुड कंपनी मध्ये सॅलेस एजेंट म्हणून कामाला लावून दिले. सकाळी नोकरी आणि संध्याकाळी दारू हेच त्याचे जीवन झाले होते आणि त्यात काल मधुराला इतक्या वर्षानी बघून आशेचा एक किरण दिसला. " मधुरा मला माफ कर मी तुझा गुन्हेगार आहे, मला माहीत आहे माझी चुक ही अक्षम्य आहे पण तू मोठ्या मनाची आहेस मला जवळ कर मी हरलो ह्या आयुष्याशी झगडताना मी हरलो..... माझा स्वतहाचं अस काहीच उरल नाही , सोन्यासारखी बायको असताना तिचा विचार केला नाही.... होणार्‍या बाळाचा विचार केला नाही ..जेव्हा तुला माझी खरी गरज होती तेव्हा स्वतहाच्या स्वार्थापोटी मी निघून गेलो तुला सोडून, जवाबदारीतून हात वर केले आणि तुला सोडून निघून गेलो मला माफ कर ....मला माफ" मानस अगदी मधुरच्या पाया पडला, पण मधुरा मात्र आपल्या मनाशी, विचरांशी पक्की होती...माफ करण्याचा प्रश्नच येत नाही कारण त्या माणसाने तिची साथ अर्ध्यावर सोडली, तिच्या मुलीला बघितले सुद्धा नाही आज तो त्या मुलीवर हक्क मागतोय... ज्याला आपल्या मुलीचा नावदेखील माहीत नाही त्याला ती तिच्या आणि तिच्या मुलीच्या विश्वात कस येऊ देईल?? . मधुराने त्याला खड्सावुन सांगितले माझा तुझा काही ही संबंध नाही, पत्नी म्हणून तुझ्या नावाच मंगळसूत्र गळ्यात घालते इतकच नातं आहे कारण समाजात तिला एकटीला राहणं किती कठीण गेला हे तिच तिला माहीत. ज्यावेळी अनघाला आईची गरज होती तेव्हा मधुराला घरा बाहेर पडाव लागल नोकरनिमित्ताने. त्यातूनही ती वेळात वेळ काढून आपल्या मुली बरोबर रमत असे आणि बाप म्हणून मानस ने काय केले?? इतक्या वर्षात एकदाही वाटलं नाही त्याला आपली बायको, मुलगी कुठे आहे हे बघावे, आणि आज आपण केलेल्या गुन्ह्याची सोयीस्करपणे माफी मागून काय साध्य करायच होत मानस ला?? " नाही नाही" मधुर म्हणाली "हे कदापि शक्य नाही तू आता आमच्या आयुष्यात कधीच येऊ शकत नाही...आणि का यावे परत सोडून जायला??...काय चुकल होत मानस माझ?? पत्नीची जी काही कर्तव्य होती तीच पार पडत होते ना....घर चालवल कारण तू दारूच्या आहारी गेला होतास तर तुझा अहंकार दुखावला गेला..मी कधी ही तुला ही जाणीव करून दिली नाही की मी श्रेष्ठ, माझा पगार जास्त वगैरे जे काही करत होते ते आपल घर वाचवण्यासाठी, संसार वाचवण्यासाठी...पण नाही तू चुकीचा अर्थ काढून आम्हाला सोडून निघून गेलास आणि आता तुझा आमच्या आयुष्यात परत येण शक्य नाही तू इथून निघून जा, मला तुझा तोंड देखील बघायची इच्छा नाही".



****************************************************************************************



गेल्या कित्तेक महीन्यांपासून तुला गलीतगात्र बघतेय. एकेका दिवसागणिक धीर खचत जातोय. थोड्या वेळापूर्वी डॉक्टरांनी येऊन सांगीतलंय, आता फक्त काही तास फार तर एखाद दिवस मोजा. मधुराचा धीर खचत चालला होता, पाय गळून गेले होते आणि डोक्याला मुंग्या आल्या होत्या. आयुष्यात अस काही आपल्याला अनुभवायला मिळेल असा वाटलं देखील नव्हत. आजपर्यंत प्रत्येक अडथळे आले त्याना धीटपणे सामोरे गेली होती मधुरा पण हे सत्य झेलण्याची मानसिक तयारी अजिबात नव्हती. दारूच्या आहारी गेल्यामुळे मानसचे लिवर 80% फेल झाले होते तो कोमात ही गेला होता, दिवसेंदिवस त्याची तब्य्येत खालावत होती. गेला 11/2 महिना मधुरा रोज हॉस्पिटलला येत असे मानसची तब्य्येत कशी आहे, त्याच्यावर औषोधोपचार करण्यासाठी...ह्याचा अर्थ तिने त्याला माफ केले अस नाही पण एक पत्नीधर्म म्हणून. तो आजपर्यंत तिच्याशी वाईट वागत आला पण म्हणून त्याचा अस काही व्हाव अस तिला कदापि वाटलं नाही.

त्याच्या शेवटच्या क्षणी तिला त्याची साथ द्यायची होती...आयुष्यभर त्याने दिली नाही ....म्हणून एक पत्नी म्हणून, आई म्हणून तिला त्याचा ह्या प्रवासात त्याला आधार द्याचा होता. त्याच्या वेदना तिला जाणवत नव्हत्या पण त्यातली अर्तता मात्र ती समजू शकत होती. आज त्याला मृत्युशी झुंजताना ती बघत होती, डोळे भरून बघत होती आयुष्यात त्याच नसणं ह्याचा अनुभव तिला होता पण आता जगात नसणं हे मात्र तिच दुर्दैव. त्याच्या भावानाशून्य नज़रेत ती बघत होती आणि मनोमन प्रार्थना करत होती की तुझ्या निरोपाची वेळ जवळ आली आहे, अश्रू जुमानत नाही आणि माझा जीव तुला वाचवण्यासाठी घुतमळ्तोय... पण आता फार उशीर झाला आहे, मानस खूप प्रेम होत तुझ्यावर, आहे ही....पण तू त्या भावना कधीच समजू शकला नाहीस असो एकच इच्छा की ह्या प्रवासात तुला कुठलाच त्रास न होवो, माझे दुख आता मला कुर्वाळत बसायचे नाही कारण जगण्याची उमेद नव्हती तेव्हा जगलो आपण कारण आपल्या पदरात एक बाळ होत आणि आज त्या बाळासाठी..अनघासाठी मला जगावं लागेल....तुला माफ ही केल असत पण आत ते शक्य नाही...वीस वर्षाचा काळ हा खूप मोठा असतो, म्हणून तुझी साथ नाही सोडणार... ह्याच अनंताच्या पाउलवाटेवर कधीतरी तुझ्या सोबतीला येणारी तुझी पत्नी.... अश्रू वाहताच होते आणि एक उष्ण स्पर्श मधुराला जाणवला , तिने मागे वळून बघितले तर अनघा तिला धीर देत होती,"आई बाबा कोण, कसे असतात ह्याची मला कधीच तू जाणीव होऊन दिली नाहीस, माझ्यासाठी आई ही तूच आणि बाबाही आणि मला तुझा अभिमान आहे, एक स्त्री होण्याचा अभिमान आहे...तुझ्या ह्या कठीण परिस्थितीत मी तुला नक्की साथ देईन" मधुराला हुंदका अवरला गेला नाही आणि ती अनघाच्या कुशीत आवेगाने रडू लागली....तिची अनघा आता मोठी झाली होती...

3 comments:

  1. A very gud story... doesnt look like first attempt in story-writing!
    If u wud ask me... i think explaining a event cms naturally in u... but the story also has shown tht u can do detailing! That is something which is a new-found image of the writer in Sanika... that part of u has really come out very well.
    Keep writing sis!

    ReplyDelete
  2. A very intersting and touchy story bunta, Good attempt. Very proud dear. Keep going....

    ReplyDelete