लॉकडाऊनच्या काळातील आमचे अनुभव, त्या दरम्यान इथे अमलात आणलेले नियम याबद्दल या हा लेख लिहिण्याचा प्रयत्न केलाय. लेख एकत्रितपणे लिहिला तर फारचं लांबेल म्हणून भागांमध्ये लिहिण्याचे ठरवले आहे.
डिसेंबर २०१९ ला फेसबुकच्या एका कम्युनिटी पेजवर एका बाईने अमेरीकेहून भारतात व्हाया चायना जाणार्या विमानाबद्दल चौकशी केलेली आणि त्यावर अनेकांचे उत्तर व्हाया फ्लाईट न घेणे, दुसरा पर्याय निवडणे हे वाचले. असे का बरे सांगत आहे म्हणून शोधले तर चायनामधील वुहान शहारत कुठल्यातरी व्हायरसने थैमान घातल्याचे वृत्त समजले. बातमी वाचून मी फार खोलात न जाता सोडून दिली. जस-जसे दिवस पुढे जाऊ लागले तसे या व्हायरसबद्दल बर्याच बातम्या कानी येऊ लागल्या. जानेवारी महिन्यात तर या कोरोना व्हायरसबद्दल अनेक बातम्या, चर्चा वाचायला, ऐकायला मिळाल्या. या साथीची सुरुवात चीनच्या वुहान शहरातून सुरू झाली आणि जोपर्यंत या व्हायरसबद्दल जगाला समजलं तोपर्यंत अनेक प्रवासी इतर देशांत पोहोचले होते. सुरुवातीला सार्स किंवा मर्ससारखा वाटणारा हा विषाणू जेव्हा खरेतर वेगळा आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये जी भीती निर्माण झाली त्या कोरोनाचा हळू हळू होणारा पसर, प्रादूर्भाव वाढत चाललाय आणि बर्याच देशांची धांदल उडतेय हे सांभाळाण्यात हे स्पष्ट दिसत होते.
अजूनही इंग्लंडमध्ये कोरोनाची लागण कुणास झाली नव्हती. पण युरोपात या व्हायरसने शिरकाव केल्याचे समजले आंतरराष्ट्रीय विमानतळं काही ठिकाणी उड्डाणे रद्द करत होती तर कुठे बॉर्ड्रस बंद करण्यचे ठरत होते. इंग्लंडचे सर्वात मोठे हब म्हणजे हिथ्रो विमानतळ जेथून हजारो विमाने रोज टेक-ऑफ, लँड करत असतात.
आम्ही आपले अजूनही सोशल गेट-टुगेदर्स करत होतो... अगदी बिंधास्त. जानेवारीत संक्रांतिचे हळदी-कुंकू व पॉटलक पार्टी साजरी करत असताना या व्हायरसबद्दल गप्पादेखेल मारल्या. खरंतर आमचे पुढचे गेट-टुगेदर ही ठरले होते. दुसर्या फ्रेंड्सर्कलबरोबर इथे मार्चमध्ये येणार्या ईस्टर लाँग विकेंडला फ्रांसला डिस्नेलँडला मुलांना घेऊन जायचे ठरत होते. पण तोपर्यंत फ्रांस, स्पेन, इटलीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आणि मग आम्हाला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. आमचा प्लान होल्डवर ठेवून पुढे काय होते यावर लक्ष केंद्रित केले. फेब्रुअरी उजाडला आणि इथल्या शाळेत टर्म हॉलिडेज सुरु झाल्या ज्यामुळे स्थानिक लोकं फिरायला जाऊ लागले, त्यातले काही इटली, स्पेनलाही गेले आणि तिथून, एकूणच इंग्लंडमध्येही कोरोना व्हायरस तोपर्यंत पोहोचला होता.
खरंतर २८ फेब्रुअरीला युकेतील पहिली केस आढळली पण इथल्या सरकारने हर्ड इम्युनिटीच्या नादापायी सगळ्याच बाबतीत दिरंगाई केली. तिथे इटली, स्पेनची परिस्थिती बघता सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. तेथील व्हिडिओज पाहून अंगावर काटा येत असे. घरात कोंडलेल्या लोकांचे अनुभव ,हाल बघवत नव्हते. युकेतील जनता सरकार लॉकडाऊन कधी करणार याकडे लक्ष ठेवून होते. सर्वांचे धाबे दणाणले होते. भीती, काळजीमुळे हैराण झाले होते.
आम्ही जागतिक महिलादिनाचे आमचे गेट-टुगेदर ठरल्याप्रमाणे ७ मार्चला करणार होतो, त्यासाठी कुटुंबासमवेत बाहेर डिनर करायचे ठरले होते. ते आमचे २०२०मधले शेवटचे एकत्रीतपणे झालेले गेट-टुगेदर. तोपर्यंत हँड सॅनिटायझर, मास्क, ग्लव्हजचा वापर लोकं फार करत नव्हते तरी सेफ्टी म्हणून आम्ही सॅनिटायझर आणि काही प्लॅस्टिक बॅग्ज सोबत घेऊन गेलो होतो. त्यावेळी एकमेकांना मिठी मारून एकमेकांचे केलेले स्वागत चालत असे.
आमची एक मैत्रिण जीपी आहे. तिचे म्हणणे होते अजिबात पॅरॅनॉईड होऊ नका, संयमाने घ्या. जे सेफ्टी मेजर्स घ्यायचे ते घ्या पण असे घाबरून जाऊ नका. इथे बाळांची नर्सरी सुरू होती, स्वप्निल कामानिमित्त दुसर्या शहरात असे तो विकेंडला घरी यायचा. तर आठवडाभर दोन मुलांना घेऊन या कोरोनाच्या काळात कसे रहायचे या विचारांनी भंडावून सोडले होते. त्यातल्या त्यात बाळांना नर्सरीतून पिक करताना त्यांच्या हातावर सॅनिटायझर लावायला सुरुवात केली. कारमध्ये घरी येईपर्यंत त्यांना स्नॅकबार किंवा छोटा खाऊ लागत असे तो देण्यास बंद केला. काही-बाही सांगून त्यांना समजावले होते. घरी येऊन हातपाय धुण्याऐवजी थेट बाथरूममध्ये अंघोळीसाठी जायचे हे सांगितले. मुलेही छान कोऑपरेट करत.
आताशी लोकांमध्ये पॅनिक बाईंग सुरु झाले होते. लॉकडाऊन सुरू झाले तर किती काळ चालेल माहित नसल्यामुळे लोकं मोठ्या प्रमाणात अत्यावश्यक गोष्टी, ग्रोसरी स्टॉक करु लागली.
मी मुलांना नर्सरीला सोडून बाजूलाच असलेल्या सूपरमर्केटमधून जमेल तसे जास्तीचा किराणा भरायला सुरु केला होता. कडधान्यांचे टीन्स, न्युडल्स, मैदा, डाळी, कणिक, तांदूळ, मसाले, जॅम, बटर, चीझ, चीझस्प्रेड. तसेच भारतीय ग्रोसरी दुकातून वेगवेगळी पिठं, गीट्सची पॅकेट्स, फ्रोझन मिक्स्ड व्हेजिटेब्लस (अगदीच भाज्या नाही मिळाल्या तर), बीन्स, मटार भरून ठेवले होते. स्वप्निलदेखिल विकेंडला येताना तिथल्या दुकानात मिळणारे सामान आणत असे. कमीत कमी २ महिने तरी सामान पुरणार होते. लहान मुलं असल्यामुळे त्यांचा खाऊ, औषधं, वाईप्स, पुस्तके,अॅक्टिव्हिटीज सेट्स असे जमा केले होते. उद्या जर लॉकडाऊन सुरु झाले तर दूध, अंडी, बेक्रीचे सामान कसे मागवायचे हा प्रश्न होताच. ऑनलाईन सामान मागवायला स्लॉट्स सहसा मिळत नसे. त्यासाठी ऑनलाईन रांग लावावी लागे, बाळं असल्यामुळे दुध तर लागणारचं होते. शेवटी डेअरीतून दूध घरपोच मागवायचे ठरवले त्यासाठी डेअरीवाल्याला फोन केला तर समजले त्याच्याकडे आधीपासूनच नवीन गिराईकं आलियत आणि बाहेर पडायला लागू नये म्हणून खूप प्रमाणात लोकं हा पर्याय निवडत आहे. त्यामुळे अनेक फोन करूनही आम्हाला काही घरपोच दूध डिलेव्हर करणारा कुणी सापडेना शेवटी एकदाच जाऊन जास्तीचे दूध आणून ठेवायचे ठरवले.
लॉकडाऊन अजूनही सरकार ने सुरू केले नव्हते. खरंतर इथले वैज्ञानिक मार्चच्याआधीपासूनच लॉकडाउनची मागणी करत होते पण सरकार काही केल्या तयार होईना. युरोपात बर्याच देशात लॉकडाऊन केव्हाच सुरू झालेले. युके सरकाराची त्याबद्दल खिल्लीही उडवली गेली. आम्ही मैत्रिणी मुलांना शाळेत, नर्सरीला पाठवायचे का नाही याबद्दल चितींत होतो.
१३ मार्चच्या शुक्रवारी स्वप्निल घरी आला ते सांगत की त्यांच्या ऑफीसने वर्क फ्रॉम होम करायला पर्मिशन दिली आहे. त्यामुळे मला हायसे वाटले. पण तरी अजून एक प्रश्न डोक्यात सुरूच होता, मुलांची नर्सरी, ती तर सुरूच होती. सोमवारी मुलांना नर्सरीला सोडले खरे आणि घरी येऊन मॅनेजरला ई-मेल करून ते काय करणार याबद्दल विचारले. मॅनेजर जोच्या म्हणण्यानुसार नर्सरी अजूनतरी सुरू राहणार होती जोपर्यंत सरकार काही निर्णय देत नाही तोपर्यंत तरी. आम्ही दोघांनी शेवटी ठरवले मंगळवारपासून आपण मुलांना पाठवायचे नाही आणि तसे नर्सरीला कळवले.
इथे सरकारने शेवटी २० मार्चपासून शाळा बंद केल्या. २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाले आणि एका वेगळ्याच अनुभवाला / बदलाला सामोरे जाण्यासाठी लोकं तयार होऊ लागली.
No comments:
Post a Comment