लॉकडाऊनची घोषणा इथल्या सरकारने अमंळ उशीराच केली. त्याआधी नुसते जनहीत में जारी सूचना देत बसले.
२७ मार्च दरम्यान इथले पंतप्रधान बोरीस जॉन्सन, प्रिंस चार्ल्स व हर हायनेस राणी सरकार यांना कोरोना झाल्याची बातमी आली. बोरीस जॉन्सन तर अतिदक्षता विभागात अॅड्मिट असल्याचे वृत्त समजले आणि एकूणचं जनमासात एक भीतीची लहर उमटली. एकूणच चिंता वाढत होती, लागण झालेल्या रुग्णांची संख्या व डेथ रेट पाहता हे काही बरोबर दिसत नाही, धोक्याची चिन्हे दिसू लागली.
लॉकडाऊन खूप आधीच सुरू करायला हवे होते असे जनतेचे म्हणणे पडले पण ब्रिटीश कारभार बघता काय बोलणार.
शाळा बंद झाल्या असल्या तरी होम स्कूलिंग सुरु ठेवायचे अशी सरकारने मोहिम काढली. फ्रंटलाईन वर्कर्सची मुले यांच्यासाठी डे केअर, नर्सरी, शाळा सुरू ठेवल्या होत्या. ज्यांना वर्क फ्रॉम होम करता येण्यासारखे आहे त्यांनी ते करावे अणी ज्यांना बाहेर ऑफिसला जावे लागणार त्यांनी नॉर्म्स फॉलो करावे असे सरकारने सांगितले. जनतेला दिवसातून एकदा जॉगिंगला, वॉकला, सायकलिंगला बाहेर पडण्यास परवानगी होती. जिम, स्विमींग पूल्स बंद केले गेले.
लॉकडाऊन सुरु झाल्यावर इथल्या सरकारने कोरोना व्हायरस अॅक्ट २०२०पास केला. या कायद्याअंतर्गत सरकारने काही नियम बनवले ज्यात सरकारला डिस्क्रिशनरी पावर / अधिकार होता. कुठल्याही पब्लिक गॅदरींगला परवानगी नव्हती तसेच पब्लिक ट्रान्सपोर्ट कंट्रोल किंवा निलंबीत करणे, दुकाने, रेस्टॉरंट्स अल्पकालीन सुरू-बंद ठेवायचे अधिकार त्यांनाच असणार होते,
याशिवाय या कायद्याचा फायदा भाडेकरू, एमर्जेन्सी स्वयंसेवक यांना झाला. हेल्थकेअर वर्कर्ससाठी स्पेशल इंश्युरंस कव्हर सुरु केले. छोट्या व्यवसायिकांचे आधीच फार नुकसान झाल्यामुळे इथल्या सरकारने फर्लो (Furlough) योजना राबवली. जे या योजनेत कव्हर होतात त्या कंपनी किंवा व्यवसायंकाच्या कर्मचार्यांचे ८०% वेतन सरकार देऊ करणार. तसेच कोरोनाला स्टेट्युटरी सिक पे मध्ये सामील करण्यात आले जेणेकरून ज्या व्यक्तिला कोरोनामुळे रजेवर जावे लागले त्याला पगार देणं कंपनीला भाग आहे हा नियम लागू झाला.
NHS नॅशनल हेल्थ सर्व्हिस वर कामाचे अधिक प्रेशर आले. त्यांचे ही बिचार्यांचे हाल सुरू होते. अधिक प्रमाणात येणार्या रुग्णांना बघणे हे मोठे काम. जीपी सर्जरी (दवाखाना) तर कुठल्याच रुग्णांना सर्जरीत येऊ देत नव्हती. अत्यावश्यक असल्यास त्यांनी सरळ NHS Emergency Number 111 वर संपर्क साधण्यास सांगितले. अगदीच वृद्ध असतील तर ते त्यांना फेस कव्हरींग घालून, अंतर ठेवून कंसल्ट करीत ते ही क्वचित. जीपी तर टेलिफोनीक अपॉईंटमेंट्स देत. त्यातल्या त्यात प्रीस्क्रिपशन थेट फार्मसीस्टकडे पाठवे किंवा टेक्स्ट मेसेजेसवर फोटो मागवी पण सर्जरीत येण्यास सक्त मनाई होती. इथल्या वृद्धांवर बंधनं लावलीयत. प्रत्येक ज्येष्ठ नागरीकाची फोनवरून नियमीतपणे तपासणी होतेय. कामं खूप वाढल्यामुळे हॉस्पीटल्समधे निवृत्त झालेल्या स्टाफ, डॉक्टर्सना पुन्हा बोलावले गेलेय.
फार्मसीबाहेर मास्क सक्तीने वापरायचा व २ मीटर अंतर राखून लाईन लावावी लागे. एकावेळी एकाला आत प्रवेश असे. इतरवेळी रस्त्यांवर गाड्यांचा गजबजाट असे पण आता त्याच रस्त्यावर शुकशूकाट असे.
सूपरमार्केट्स सुरू होते. त्यातही जे वल्नरेबल, वृद्ध, अपंग आहेत त्यांच्यासाठी सकाळचे स्लॉट्स ठेवण्यात आले जेणेकरून इतर लोकांची गर्दी होणार नाही. हेच NHS कर्मचार्यांना त्यांचे कार्ड दाखवले तर विना रांग प्रवेश मिळत असे. त्यांच्यासाठी काही सूपरमार्केट्सने वेगळे तासही ठेवले होते. लॉकडाऊनच्या धास्तीने लोकांनी अगदी वेड्यासारखे किराणा भरायला सुरू केले, काही ठिकाणी त्यामुळे सामानाचा तुटवडा होऊ लागला. म्हणून मग सूपरमार्केट्सनी एका वेळी दोनच वस्तू घेता येतील अशी बजावणी केली. आमच्यासारखी इतर अनेक लोकं ऑनलाईन ग्रोसरी मागवू लागली. त्यासाठी पण अनेकवेळा ऑनलाईन क्यु असे. काही काही वेळेला आम्ही दोन वेगळ्या सूपरमार्केट्सच्या साईटवर वेगळ्या तारखांसाठी क्यू लावत असू. एकदा का या आठवड्याचे सामान भरले की लगेच पुढील आठवडा किंवा त्यानंतरच्या उपलब्ध तारखांच्या हिशोबाने सामान बुक करत असू. सामान ज्या दिवशी डिलीव्हर होणार त्यादिवशी आमचे दोन तास पुढच्या साफ सफाईमध्येच जात.
डायनिंग टेबलचे दोन भाग केले. एका भागात आलेले सामान ठेवले जाई. भाज्या-फळं काढून मीठ घातलेल्या पाण्यात ३० मिनिटे बुडवून मग स्वछ धुवून, साफ करून, कोरडे करून स्टोअर केले जाई. कॅन्स, टीन्स डीसइंफेक्टंट स्प्रे वापरून वाईप्सने साफ करून ४८ तासांसाठी वेगळे ठेवले जाई. फ्रीजमधल्या वस्तूंना साफ करून ४८ तास हात न लावता तसेच फ्रीजमध्ये ठेवत असू. बिस्किटं, ब्रेडचे पॅकेट्सचे पण तसेच. कार्डबोर्ड बॉक्स ना तर साफ करून ७२ तास स्पर्श करत नसू. या सर्व तामझामनंतर डायनिंग टेबल, दरवाजेचे हँडल्स क्लिनींग करणे गरजेचे डिलिव्हरी करणारा तर दारात सामान ठेवून निघून जात.
हे लॉकडाऊन जर थंडीत असते तर एकवेळ काही वाटले नसते पण हे ऐन वसंतात सुरू झाले, उन्हाळ्याची चाहूल लागत होती, दिवस मोठा होत होता. हवा गुलाबी होती, बाहेर वातावरण प्रसन्न होते पण ते एंजॉय करता येणार नव्हते. अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. आमच्या शेफिल्डच्या मराठी मंडळाचा मोठा गुढीपाडव्याचा कार्यक्रमही पुढे ढकलत ढकलत शेवटी रद्द करावा लागला. हिंदू मंदिरात होणारे होलिका दहन व धुळवडीचे प्लान रहित केले गेले.
आमच्यासाठी खरे चॅलेंज होते ते सव्वा चार वर्षांच्या दोन मुलांना लॉकडाऊन काळात कसे बिझी ठेवायचे. खरंतर मुलांना बाहेर फार आवडतं. त्यांनी कधीच नर्सरीला जाण्यास कंटाळा नाही केला. अशात स्वप्निल वर्क फ्रॉम होम म्हणजे तो एकदा का ब्रेकफास्ट झाला की स्टडीमध्ये जाऊन बसे आम्ही तिघे खाली आज काय करावे बरे याचा विचार करीत बसू. दरवर्षी आजी-पप्पा येतात ते आता कधी येणार असे विचारून भंडावून सोडले होते. रोज उठून आजी-पप्पांची आठवण बाळं काढत तिथे मम्मी-पप्पा यावर्षी येऊ शकत नाही म्हणून हळहळत होते त्यांना बाळांची फार आठवण येत. आकाशात विमान दिसताच बाळं विचारी यात आजी-पप्पा आहेत का? त्यांना नाही म्हणायला मला फार जड जाई. व्हिडियो कॉल्सवर समाधान होत नसे, ते चौघे (मम्मी-पप्पा,विवान रियान)एकमेकांना खूप मिस करत.
ते काही नाही मला काहीतरी शेड्यूल ठरवायलाच हवे नाहीतर हे फार जड जाणार हे माझ्या लक्षात आले. टाईमटेबल फॉलो न करता खेळीमेळीने कसे बिझी ठेवायचे याचा विचार सुरू झाला. नर्सरीत या दरम्यान स्कूल रेडीनेस उपक्रम सुरु होणार होता. नव्याने शाळेत जाणाऱ्या पाल्यांना आपले नाव लिहियाला शिकवणार होते त्याचबरोबर अक्षर ओळख, आकडेमोज शिकवणार होते. तसे तर हे गेल्या वर्षापासूनच शिकवायला सुरु केले तरी आता शाळेसाठी प्रीपेअर करायचे म्हणून त्यावर भर होता. फिल्ड ट्रीप होणार होती मुलांची. ट्रॅफिक लाईट्स कशासाठी असतात, रस्ता क्रॉसिंग, मॉल-व्हिजीट असे होणार होते. पण आता नर्सरी बंद असल्यामुळे हे सर्व मुलांना शिकवता येणार नव्हते म्हणून नर्सरीही ईमेलवरून त्यांच्यासाठी घरात करता येईल अशा अॅक्टीव्हिटीज पाठवत.
मुलांना रोज सकाळ - संध्याकाळ अक्षर गिरवायला द्यायला सुरुवात केली. इथल्या शाळेत रोज मुलांना अटेंडेंस म्हणू आपले नाव लिहून एंट्री होती. आमच्या बाळांना ते लिहिता येतचं पण ते विसरू नये म्हणून रोजच्या रोज ते लिहून घेणं सुरु होते. नुसता अभ्यास करून कंटाळू नये म्हणून कधी त्यांना घराच्या बागेत शेडला कागद चिकटवून मनसोक्त पेंटिंग करायला दिले. स्प्रिंग क्लिनींगची आमची कामे होतीच. आम्ही गार्डन शेड , फेंस पेंट करत असताना त्यांनाही आमच्यात involve केले. त्यांनी त्यांच्या वयाच्या मनाने जे फराटे मारले ते आम्ही मग रंगवून कव्हर केले पण त्यांना ही पारीवारीक अॅक्टिव्हिटी करायला फार मज्जा आली.
कधी ते बागेत प्लेटाईमदरम्यान बबल्स उडवण्यात मग्न होत तर प्लेडोसोबत खेळत. नर्सरीने त्यांना मेझरींग वीथ हँड्स, वर्म्स अॅक्टिव्हीटी, ईटींग दी रेनबो, क्रिएटींग नेम्स वीथ पेब्ल्स असे अनेक उपक्रम दिले होते. त्याशिवाय जगभरात फ्रंटलाईन वर्कर्ससाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यसाठी, या कठीण काळात आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत म्हणून क्वारंटीन विंडो रेनबोज काढून आपल्या खिडकीवर चिकटावायचे होते. आम्ही मुलांना या उपक्रामात भाग घेण्यास सांगितले आणि त्याप्रमाणे त्यांनीही इंद्रधनुष्य काढून खिडकीवर चिकटवले. आमच्या गल्लीत व इतर गल्ल्यांमध्येही घरांच्या खिडक्यांवर असे रेनबोज आम्हाला बघायला मिळाले त्याचप्रमाणे काही लहान मुलांनी आपल्या ड्राईव्ह वेवर रंगीत खडूने, "We are together in this" असा संदेश लिहून एकमेकांना एन्करेज केले.
असेच या विचित्र काळात नित्य नेमाने काम करणारे रॉयल पोस्टचे कामगार, रोज आपली पत्रं, पार्सले घरी आणून देणारे "पोस्टी" (पोस्टमन) यांचे आभार व्यक्त करण्यासाठी "Thumbs up for yor Postie" हा उपक्रम राबवला. त्यात लहान मुले thumbs up चे चित्र किंवा पोस्ट्बॉक्सचे चित्र रंगवून आपल्या मेन डोअरवर चिकटवून त्यांना धन्यवाद व्यक्त करत. काहीजणांनी तर पोस्टीसाठी दारा बाहेर सॅनिटायझर, वाईप्ससुद्धा ठेवले होते. या सर्वात आमच्या मुलांना भाग घ्यायला खूप मजा आली.
मला विविध पदार्थ बनवायला आवडतात तर या दरम्यान मुलांनाही त्यांना जमेल ते पदार्थ बनवायला शिकवले ते ही त्यांना आवड दिसतेय हे समजून. बाळांनी CookwithV&R याखाली कुकीज, गुळ तूप पोळी, केक, फ्रुट सॅलॅड, नानकटाई, मग केक्स, न्युटेला बनाना रोल अप्स, फ्लारलेस कूकिज असे अनेक पदार्थ बनवले. मी त्यांनी तयार केलेल्या पाककृतींचे क्वारंटीन आठवण म्हणून सचित्र पुस्तक तयार केले आहे.
कधी मी त्यांना लहान मुलांचे चित्रपट ३० मिनिटे स्क्रिइन टाईम लावून बघायला देत असे. हायडी, कार्स, पीटर-पॅन हे कार्टूनमय चित्रपट त्यांनी एंजॉय केले तसेच गोष्टीची पुस्तके वाचून दाखवणे, बागेत पॅडलिंग पूल तयार करून स्विमिंग करणे, त्यांना घेऊन दूर टेकडीवर वॉकसाठी जाणे, पुढल्या दारी एका लिमिटेड एरियात स्कुटर चालवयला देणे हे करू लागले. या अशा काळात मला यांना कसे बिझी ठेवायचे असा प्रश्न पडला असताना बाळांनी छान कोऑपरेट केले. सुरुवातीला रोज उठून नर्सरीच्या कपड्यांचा सेट ते दोघे तयार करत आणि आम्ही त्यांना आपण बाहेर जाऊ शकत नाही हे सांगत असू. कारण विचारता बाहेर मॉनस्टर आहे असे आधी सांगितले पण मग विचार केला त्यांना समजेल अशा भाषेत खरे काय आहे ते सांगितले पाहिजे. बाहेर व्हायरस आहे, व्हायरस म्हणजे काय, त्यासाठी काय काळजी घ्यावी हे त्यांना सांगितले. कोरोनावर आलेले बेबी राईम्स दाखवले, लहान मुलांना सांगता यावे म्हणून पुस्तिका आणून वाचून दाखवले. त्यांनी या दरम्यान क्राफ्ट्स ही खूप केले त्यामुळे एकंदरीत सूपर अॅक्टीव्ह मुलांना बिझी ठेवण्यात मला यश प्राप्त झाले होते.
पुढच्या भागात लॉकडाऊन दरम्यान आलेला वैदकीय अनुभव आणि इतर गोष्टींविषयीचा लेख असेल.
🖋सानिका
No comments:
Post a Comment