आज सकाळी छान ऊन पडलं होतं. मुलांना शाळेत सोडून मी थेट माझ्या रोजच्या वॉकला निघाले. नेहमीचाच रस्ता, रोजची वर्दळ, सकाळी काही लोकांची कामाला जायची घाई, पालकही रस्त्यावर चालताना दिसत होते. कुठे छोट्या छोट्या दुकानाबाहेर तुरळक लोकं रांग लावून उभे होते. जॉगर्स जॉग करत होते. वाटेत रॉयलमेलचे डोर डिलिव्हरी ऑफेस आहे, सकाळी - सकाळी तिथल्या पोस्टींची लगबग सुरू असते. त्यांचे पत्र योग्य पत्त्यांवर पोहोचवण्यसाठी सॉर्टिंग सुरू असतं, काही आपली पत्रांची ट्रॉली / कार्ट घेऊन तर काही गाडी घेऊन निघालेले असतात...अ व्हेरी बिझी मॉर्निंग!
मी चालत चालत आज स्टेशनच्या पुढे जायचे ठरवले होते. मागच्या आठवड्यात पाहिलेले डॉफोडिल्स आता फुलली आहेत. सुंदर पिवळ्या फुलांचा घोस अगदी सुखकारक. आम्हीसुद्धा आमच्या बागेत डॅफोडिल्सचे कांदे / बल्ब पेरलेत, उगवायला सुरूवात झालिय. स्टेशन पार केल्यावर काही घरांची रांग लागतेआणि विरुद्ध दिशेला इथले प्रसिद्ध एक्क्लसल वुड्सची सुरूवात होते. अप्रतिम असे हे वुडलँड आहे. इथे अनेक चेस्टनट्स, बीच, लार्च, पाईनची झाडं आहेत साधारण १५ किमीचा फुटपाथ या वुड्सला लागून आहे, इतके मोठे आहे. इथे जवळच अॅबीडेल मिनीअचर रेल्वे आहे जी वर्षातून काही मोजके दिवसचं राईडसाठी सुरू केली जाते, लहान मुलांना मस्तं मज्जा वाटते. या वुड्सबद्दल सविस्तर केव्हातरी माहिती लिहिन.
पुढे चालत आल्यावर मला ब्युशीफ बाग लागली. अगदी गोडूली, छोटेखानी अशीही बाग आहे. या बागेची देखरेख रोटरी क्लब ऑफ शेफिल्ड व्हलकन करते. ही बाग शीफ नदीच्या वायव्येकडे आहे. सद्धरण १९३५ साली ही इथे तयार केली गेली. ही बाग काही सुचिपर्णी वृक्षांनी बहरली आहे व जवळच लिंब ब्रुक ओढा वाहतो जो पुढे जाऊन ब्युशीफ धरणाला जाऊन मिळतो. बागेत शिरताच दगडी पायर्यांची रचना दिसते. पुढे जाताच मल दो बदकों का जोडा दिसला. गवतावर छान ऊनाला आले होते.बागेत ही काही फुलं लावलियत जी हळू-हळू उमलू लागली आहेत. एका बाजूला शीफ नदी, तर मागच्या बाजूला रेल्वे ट्रॅक. नदीत बदकांची माळ विहार करत होती. मस्तं वाटत होते बघायला. मागून रेल्वे धडाडत गेली. फिशींग करायला ज्या ठिकाणी लोकं जातात तो जरा चिखलाच असल्यामुळे मी त्या रस्त्याला गेले नाही. बागेच्या दुसर्या बाजूला अनेक लाकडी बाकडी आहेत. अजूनही झाडे निष्पर्ण आहेत पण गवतावर जांभळ्या -पांढर्या रंगाचा गालिचा असावा अशी फुले फुललीयत. एकीकडे तर फुलांचे र्हीथ (पुष्पहार) असल्याप्रमाणे गोलाकार फुलं होती, सुंदर!
अगदी रिलॅक्स होण्यासाठी ही जागा उत्तम. बाहेर पडून जवळच असलेल्या शीफ नदीच्या काठावर उभे राहिले. सकाळचे कोवळे ऊन,चमचमणारे पाणी अगदी नेत्रसुखद. छान शीतल, प्रसन्न वाटत होतं.अशी सकाळ मला फार आवडते नाहीतर सतत ढगाळ, पाऊस, गारवा अगदी कंटाळवाणे होऊन जातं...असो. तर अशाच एका सुंदर, शांत, सुखद सकाळचा आस्वाद घेत घराकडे पावलं वळली.




















No comments:
Post a Comment